जगाला दाखवा गोव्याची मंदिर संस्कृती; परिषदेत उमटला सूर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 03:00 PM2023-12-11T15:00:40+5:302023-12-11T15:01:25+5:30

कॅसिनो, सनबर्नवरून होतेय बदनामी

show the world the temple culture of goa | जगाला दाखवा गोव्याची मंदिर संस्कृती; परिषदेत उमटला सूर 

जगाला दाखवा गोव्याची मंदिर संस्कृती; परिषदेत उमटला सूर 

लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : गोवा म्हणजे कॅसिनो, सनबर्न पार्टी असा प्रचार केला जात आहे. पण, प्रत्यक्षात गोव्याची ही खरी संस्कृती नाही. त्यामुळे गोव्यातील मंदिर पर्यटनाचा योग्य तो प्रसार व प्रचार झाल्यास इथे सुद्धा पर्यटक वाढीस लागतील, असा आशावाद हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी व्यक्त केला.

म्हार्दोळ येथील श्री महालसा मंदिर परिसरातील सिंहपुरुष सभागृहात गोमंतक मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपिठावर गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ शेफाली वैद्य, हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रसारक संत सद्‌गुरु निलेश सिंगबाळ उपस्थिती होते.

यावेळी पद्मश्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले, फोंडा येथील श्री गौडपादाचार्य मठाचे पिठाधीश स्वामी प. पू. श्रीमद् शिवानंद सरस्वती यांनी पाठवलेल्या संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले. जयेश थळी म्हणाले की, धकाधकीच्या जीवनात मंदिरे ही मनःशांतीची ऊर्जास्त्रोत आहेत. आपल्या पूर्वजांनी अनेक अत्याचार सहन करून मंदिरांचा वारसा आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. त्यामुळे मंदिरांचे संवर्धन आणि जतन करणे अत्यावश्यक आहे.

शेफाली वैद्य म्हणाल्या की, गोव्यातील मंदिरे मराठी शिक्षण, संस्कृती यांची केंद्रे होती. या मंदिरांच्या माध्यमातून गोवा हा भारतीय संस्कृतीशी जोडला गेला. पोर्तुगिजांनी हे हेरून हिंदूची ही संस्कृती नष्ट करण्याच्या उद्देशाने अगोदर मराठी भाषेतील शिक्षण बंद केले आणि मग मंदिरे नष्ट केली. पूर्वी मंदिरात शाळा भरायची, कीर्तने, भजन, पूजा-अर्जा व्हायची, त्यामुळे हिंदू मुले लहानपणापासूनच मंदिरांशी जोडलेली रहायची, असेही त्यांनी सांगितले. उद्घाटन सत्रानंतर विविध विषयांवर उद्बोधन सत्र आणि परिसंवाद झाले. परिषदेला सुमारे २५० मंदिरांचे विश्वस्त, समितीचे सदस्य, भक्त आदींची उपस्थिती होती. 

परिषदेत सूत्रसंचालन सुमेधा नाईक आणि राहुल वझे यांनी केले. रमेश शिंदे म्हणाले की, गोव्यात काही ठिकाणी विश्वस्त, महाजन, पुरोहित यांच्यात वाद असल्याचे पहायला मिळते. त्यामुळे अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट झालेली आहेत. खरे तर हे वाद आपापसांमध्येच धार्मिक शास्त्रे आणि धर्माचार्य यांच्याद्वारे सोडवले गेले पाहिजेत. न्याय मिळवण्यासाठी आपण सेक्युलर शासनावर अवलंबून राहिल्यास सरकारला मंदिरांत हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळतो आणि त्याचा गंभीर परिणाम पुढे भोगावा लागतो.
 

Web Title: show the world the temple culture of goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.