नवरात्र विशेष: नऊ रूपांचा साक्षात्कार देणारी मडकई येथील श्री नवदुर्गा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 12:57 PM2023-10-16T12:57:31+5:302023-10-16T12:59:36+5:30
'मडकईकान' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मडकईतील श्री नवदुर्गा देवीच्या मखरोत्सवाला वेगळे स्वरूप लाभलेले आहे.
यामिनी मडकईकर, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: अंत्रुज महाल- म्हणजेच फोंडा तालुका. या तालुक्याला देव देवतांची भूमी म्हणून ओळखले जाते. या तालुक्यात अनेक देवदेवतांच्या प्रसिद्ध मंदिरांची रेलचेल आहे.कवळे, रामनाथी, बांदोडा, म्हार्दोळ, मंगेशी शिरोडा, बोरी, नागेशी या भागांमध्ये असलेल्या देवीदेवतांच्या मंदिरांमध्ये नवरात्रात एक वेगळाच उत्साह दिसून येतो. 'मडकईकान' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मडकईतील श्री नवदुर्गा देवीच्या मखरोत्सवाला वेगळे स्वरूप लाभलेले आहे.
आजही गोव्यातील विविध भागांमध्ये स्थायिक झालेले देवीचे भक्तगण, कुळावी, गावकरी नवरात्र उत्सवाला मखरात बसलेल्या देवीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावतात. नवदुर्गा देवीचा मखर उत्सव आकर्षक व देखणा असतो. देवीचे आसन ही दर दिवशी ठरलेले आहे. अश्वारुढ, वाघावर स्वार, मारुती, हत्ती, नंदी, मोर, गरुड, भारुड, सिंह अशा विविध आसनांत ती दर्शन देते.या नऊ दिवसांत देवीचे शृंगारिक बुद्धिमान, शांतीप्रिय, गती, शौर्य, शक्ती अशी विविध रूपे दाखवली जातात तर शेवटच्या दिवशी देवीचे रौद्र रूप म्हणजेच दुर्गेचे रूप दाखवले जाते. नवदुर्गा देवस्थानात नवरात्रीला वेगळे वैशिष्ट्य म्हणजे नवमीच्या दिवशी महानवमी म्हणजेच या दिवशी देवीला केळीच्या गब्यापासून वेगळी आरास केली जाते. महानवमीच्या दिवशी रात्रभर देवीचे मंदिर भक्तगणांसाठी खुले असते. पहाटेपर्यंत देवस्थानात विविध कार्यक्रम उपक्रम राबवले जातात. भजन ,कीर्तन पालखी, उत्सव, तसेच मखरउ त्सव असे कार्यक्रम होत असतात.
नवदुर्गा देवस्थानात दर महिन्याला येणारी नवमी उत्सव सर्व गावकरी व भक्तगण मिळून मोठ्या उत्साहाने साजरा करतात. याचप्रमाणे देवीचा जत्रोत्सव हा संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे. केवळ गोव्यातच नव्हे तर कर्नाटक, महाराष्ट्र , आंध्र प्रदेश, अमेरिका तसेच अन्य भागामध्ये विखुरलेले आहे. जत्रा तसेच नवरात्री उत्सवाला अन्य राज्यातील देवीचे भक्तगण कुळावी, विशेषता देवदर्शनासाठी येत असतात. याशिवाय गावातील सर्व गावकरी एकत्र येऊन शिगमोत्सवाला नमन घालतात व देवीचा आशीर्वाद घेतात.