श्रीपाद यांनी पत्करली पक्षासमोर शरणागती
By admin | Published: December 29, 2016 02:01 AM2016-12-29T02:01:21+5:302016-12-29T02:03:25+5:30
पणजी : पांडुरंग मडकईकर यांच्याबाबतीत मला काहीच न सांगता त्यांना पक्षात घेण्यात आले; ही पक्षाची चूकच आहे, असे पुन्हा
पणजी : पांडुरंग मडकईकर यांच्याबाबतीत मला काहीच न सांगता त्यांना पक्षात घेण्यात आले; ही पक्षाची चूकच आहे, असे पुन्हा एकवार सांगणारे केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी पक्षाची इच्छा शिरसावंद्य असल्याचे त्याच दमात सांगत शरणागती पत्करली आहे.
मडकईकर यांच्या पक्षप्रवेशामुळे नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक यांच्या उमेदवारीवर पाणी फेरले गेले. आपल्याला अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आला असे सांगून त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली खरी; पण हा सूर संयत ठेवण्याकडेच त्यांचा कल दिसला. आपण किंवा मुलगा सिद्धेश नाराज असलो तरी पक्षाच्या विरोधात पावले उचलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सांगत त्यांनी नाराजी ही पेल्यातले वादळ ठरल्याचे संकेत स्पष्टपणे दिले.
आपण नेहमीच पक्षहिताला प्राधान्य दिले असून आताही पक्षांतर वा पक्षविरोधी कारवायांनी विद्रोह करणे शक्य नाही
असे त्यांनी सांगितले. डिजी धन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी आयनॉक्स परिसरात
आले असता पत्रकारांनी त्यांना या वादासंदर्भात छेडले.
मडकईकर यांच्या प्रवेशास नाईक
यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यांचे पुत्र सिद्धेश नाईक कुंभारजुवे मतदारसंघात भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून गणले
जात होते. त्यासाठी कुंभारजुवे मतदारसंघात गेली साडेचार वर्षे त्यांनी काम केले
होते.
या मतदारसंघात कधी नव्हे ते भाजपचे मंडळ त्यांच्याकडून उभे करण्यात आले होते व ते अत्यंत सक्रिय होते. मडकईकर यांच्या प्रवेशानंतर दुखावलेल्या कार्यकर्त्यांनी सिद्धेश यांच्या घरी धाव घेतली होती व त्यांना पक्षाच्या निर्णयाविरुद्ध बंड
करण्याचा आग्रह केला होता. या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्यासाठीही गळ घातली होती.