लोकसभेसाठी उत्तर गोव्यातून पुन्हा श्रीपाद नाईक? संभाव्य उमेदवाराचे नाव न घेता अप्रत्यक्ष घोषणा
By काशिराम म्हांबरे | Published: February 14, 2024 06:06 PM2024-02-14T18:06:54+5:302024-02-14T18:08:15+5:30
आपण ही घोषणा आपण करू शकत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी केलं सुतोवाच
काशीराम म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: लवकरच संपन्न होणाºया उत्तर गोवा लोकसभा मतदार संघासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे नाव निश्चित मानले जाते. उत्तर गोव्यासाठी भाजपतर्फेलोकांना हवा तोच उमेदवार दिला जाईल. हा उमेदवार कोण हे लोकांना ठाऊक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. उत्तर गोव्यासाठी निवडणुक कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संभाव्य उमेदवाराचे नाव न घेता अप्रत्यक्ष घोषणा करुन श्रीपद नाईक यांचेच नाव निश्चीत झाल्याचे संकेत त्यांनी दिले.
उत्तर गोव्यासाठी पक्षाचा उमेदवार कोण असेल हे सर्वांना ठाऊक आहे. उमेदवाराची घोषणा पक्षाकडून अधिकृत रित्या केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवार कोण हे माहित असूनही त्याची घोषणा आपण करू शकत नसल्याचे मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.
म्हापसातील पक्ष कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार तसेच प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री रोहन खंवटे, निळकंठ हळर्णकर, आमदार जेनीफर मोन्सेरात, डॉ. दिव्या राणे, प्रवीण आर्लेकर, प्रेमेंद्र शेट, केदार नाईक, मायकल लोबो, डिलायला लोबो, राजेश फळदेसाई तसेच मगोपचे आमदार जीत आरोलकर अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेटये भाजपचे पदाधिकारी, माजी आमदार आदी मान्यवर उपस्थित होते.
मागील १० वर्षात केंद्राकडून राज्य सरकारला ३० हजाराहून जास्त कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी देण्यात आला. त्यातून अनेक विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. केंद्रात तसेच राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारामुळे हे शक्य झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी रोहन सदानंद तानावडे,रोहन खंवटे, श्रीपाद नाईक, निळकंठ हळर्णकर, मायकल लोबो आदी नेत्यांची भाषणे झाली. पक्षाचे महासचिव राजसिंग राणे यांनी सुत्र संचालन तसेच आभार प्रदर्शन केले.