श्रीपाद नाईक पुन्हा केंद्रात मंत्री, यावेळी कॅबिनेट दर्जा शक्य? आज सायंकाळी होणार शपथविधी
By किशोर कुबल | Published: June 9, 2024 12:57 PM2024-06-09T12:57:40+5:302024-06-09T12:57:40+5:30
आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणार असून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहेत
किशोर कुबल, पणजी: उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून एक लाखाहून अधिक मताधिक्क्याची आघाडी घेऊन विजयाची ‘डबल हॅट्रिक’ केलेले श्रीपाद नाईक यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश निश्चित झाला आहे. आज सायंकाळीच त्यांचा मोदीजींच्या शपथविधी सोहळ्यात शपथविधी होणार असून त्यांना यावेळी केबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता आहे.
भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीपाद यांना आज सकाळीच फोनवर शपथविधीसाठी तयार रहा, असा सांगण्यात आले. त्यानंतर गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. श्रीपाद हे दिल्लीतच आहेत. वीजमंत्री सुदिन ढवळीकर, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार दिगंबर कामत तसेच अन्य काही आमदार, पदाधिकाय्रांनी दिल्लीत भेट घेऊन अभिनंदन केले.
श्रीपाद यांनी या निवडणुकीत तब्बल १ लाख १६ हजारांचे विक्रमी मताधिक्क्य मिळवले त्याच बरोबर विद्यमान लोकसभेत सर्वाधिक काळ खासदार असलेल्या यादीतही त्यांचे नाव आघाडीवर आहे. याआधी त्यांनी केंद्रात पर्यटन, जहाज बांधणी, आयुष, संरक्षण आदी विविध खात्यांचे राज्यमंत्रिपद सांभाळले आहे. प्रथमच त्यांना केबिनेट दर्जा मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त
दरम्यान, श्रीपाद यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होत असल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले कि,‘ मोदींच्या तिसय्रा कार्यकाळात गोव्याला केंद्रात प्रतिनिधित्त्व मिळत आहे. श्रीपाद यांना मंत्रिपद मिळत असल्याने गोवा सरकारला तसेच राज्यातील जनतेला निश्चितच त्याचा फायदा होईल.