उत्तरेत श्रीपादभाऊंवर 'मतांचा पाऊस'; सत्तरी, डिचोलीसह बार्देशमधून मिळाले मोठे मताधिक्क्य
By किशोर कुबल | Published: June 5, 2024 10:08 AM2024-06-05T10:08:25+5:302024-06-05T10:11:32+5:30
श्रीपाद नाईक यांना प्रचंड मताधिक्य देत त्यांच्या घवघवीत यशाचे शिल्पकार ठरले.
किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात सत्तरी, डिचोली व बार्देश हे तीन तालुके भाजप उमेदवार केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना प्रचंड मताधिक्य देत त्यांच्या घवघवीत यशाचे शिल्पकार ठरले.
गेल्या ६० वर्षांत एकाही उमेदवाराला लीड मिळू शकले नाही एवढे लीड श्रीपाद यांना केवळ पर्ये मतदारसंघात मिळाली. सर्वाधिक १९,९५८ मतांचे लीड त्यांना येथे प्राप्त झाले. यात स्थानिक आमदार दिव्या राणे यांचे मोठे योगदान आहे. पर्यंत काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप यांना केवळ ३,६३९ मतांवर समाधान मानावे लागले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रचारासाठी इतर ठिकाणी व्यस्त राहिले, तरी साखळीत १५,७६४ मतांची आघाडी श्रीपादना मिळाली. वाळपईत श्रीपाद यांना १३,००५ मतांची लीड प्राप्त झाली.
केंद्र व राज्य सरकारने गोव्यात केलेली विकासकामे, वेगवेगळ्या योजना, पायाभूत सुविधांचे निर्माण व मोदी की गॅरंटी हे प्रचारातील प्रमुख मुद्दे होते. श्रीपाद यांनी सहाव्यांदा निवडणूक लढवून विजयाची डबल हॅट्ट्रिक केली, त्यावरून लोकांनी हे मुद्दे स्वीकारल्याचे स्पष्ट होते.
थिवी मतदारसंघात भाजपला ११,७९९, पणजीत बाबुश मोन्सेरात यांच्या मतदारसंघात ८१९८, उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्या म्हापसा मतदारसंघात १२,३३० मते मिळाली. पर्वरीत मंत्री रोहन खंवटे यांच्या मतदारसंघात १२,६२३ मते मिळाली. डिचोलीत अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या मतदारसंघात १५,५२३ मते भाजपने मिळवली. प्रियोळमध्ये मंत्री गोविंद गावडे यांनीही चांगली कामगिरी केली. या मतदारसंघात श्रीपाद यांना १५,३०८ मते मिळाली.
५६ टक्के मते
भाजपला उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात ५६ टक्के मते मिळालेली आहेत. केंद्रातही भाजपची सत्ता येणार असल्याने पुन्हा डबल इंजिन सरकार प्राप्त होणार आहे. त्यामुळे विकासकामे गतीने होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, म्हापसा येथे झालेली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विराट जाहीर सभा भाजपसाठी मते खेचण्यात फायदेशीर ठरली.