शुद्रांनो, इंग्रजीची कास धरा; ब्राह्मणांना संस्कृत शिकवायला पाठवा - कांचा इलय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 04:53 PM2018-12-09T16:53:19+5:302018-12-09T17:13:47+5:30
इंग्रजी ही विदेशी भाषा नाही. ती भारतीय भाषाच आहे. जागतिक अवकाशात तिला महत्त्व असल्याने ती सर्वाना जोडणारी भाषा आहे.
पणजी : इंग्रजी ही विदेशी भाषा नाही. ती भारतीय भाषाच आहे. जागतिक अवकाशात तिला महत्त्व असल्याने ती सर्वाना जोडणारी भाषा आहे. त्यामुळे शुद्रांनो, आता इंग्रजीची कास धरा, ब्राह्मणांना संस्कृत शिकवायला पाठवा असा घणाघात इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित कला आणि साहित्य महोत्सवात ज्येष्ठ दलित विचावंत कांचा इलय्या शेफर्ड यांनी केला. त्यांनी एक नवीन पक्ष स्थापन केला असून त्याचा मूळ उद्देश सरकारी शाळांत स्थानिक भाषांऐवजी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणे हा आहे.
ते म्हणाले, देशात सध्या गाईंच्या नावाने मोठे अवडंबर माजवले जात आहे, पण तोच दर्जा आपल्या लोकांनी म्हशींना दिलेला नाही. काळय़ाची आपल्याला एवढी पराकोटीची नावड असेल तर पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी आपण एवढे का धडपडतो? ब्राह्मणांना गाईंबद्दल एवढेच प्रेम असेल तर त्यांनी मुलांना एनआरआय बनविण्याऐवजी देशात गाईची सेवा करण्यास सांगावे. पण ते होणार नाही. त्यांना परदेशातून आल्यावर आम्ही पोसलेल्या गाईंची पूजा करायची असते. म्हणजे गाई आम्ही पोसा, त्यांची देखभालही करा आणि हे आयते केवळ त्याची पूजा करणार. हा दांभिकपणा आहे.
आपला मुद्दा पुढे रेटताना ते म्हणाले, काँग्रेस पक्षावर तीन नेत्यांचा प्रभाव आहे. गांधी (वैश्य). नेहरू (काश्मिी ब्राह्मण ) आणि सरदार पटेल (शूद्र). पण सरदारांच्या जातीची कधी चर्चा झाली नाही. देशाच्या फाळणीत ज्या तीन नेत्यांना समावेश होता त्यात होते जिना (बनिया जे नंतर मुसलमान झाले), गांधी, सरदार पटेल (ज्यांनी सर्वप्रथम फाळणीची कल्पना मान्य केली) आणि इक्बाल (काश्मिरी ब्राह्मण नंतर मुसलमान झाले). आश्चर्याची गोष्ट म्हणजे गांधी आणि नेहरूंनी आत्मचरित्र लिहिले पण सरदारांनी लिहिले नाही. नेहरू आणि ते एकाच तुरुंगात होते. पण शुद्रांनी लिहिणे समाजमान्य नव्हते, म्हणून त्यांनी लिहिले नाही. भाजपा सरदारांचा उदोउदो करते कारण ते वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार करायचे आणि ते त्यांच्या उजव्या विचारसरणीचे धार्जिणे आहेत अशी त्यांची समजूत आहे. मोदी ओबीसी म्हणवत असले तरी त्यांची पार्श्वभूमी वैश्यांची आहे.
पेरीयार आणि फुले हे केवळ दोघे मुख्य शूद्र नेते होते ज्यांनी काही वैचारिक लिखाण केले. नाही तर भारतात शूद्र विचारवंत जवळपास नाहीत. शूद्रांचे नेमके स्थान काय आहे? मराठा, गुज्जर, जाट या जमाती कलाकार आणि कृषक म्हणून ओळखल्या जात. ते इतिहास काळापासून अस्तित्वात आहेत. पण उजव्या विचारसरणीचे लोक भारताचा इतिहास वेदकाळापासून सुरू झाला असे मानतात. पण भारतीय संस्कृती ख-या अर्थाने उदयाला आली ती सिंधू नदीवरील हडप्पा संस्कृतीपासून.
मजा म्हणजे भारतातील सर्व देव राष्ट्रवादी आहेत. देव आणि धर्म ही संकल्पना आंतरराष्ट्रीय असली पाहिजे. पण ऋग्वेदातील ब्रह्माने केवळ भारतीय लोक जन्माला घातले आणि तेही चार वर्णात. त्याने आंतरराष्ट्रीय जमात निर्माण केली नाही. आंबेडकरांच्या मते अस्पृश्यता भारतात आली ती मेलेल्या गाईचे मांस खाणा-या लोकांच्या संदर्भात. पण देवांनी अस्पृश्यता निर्माण केली आहे का?
वेदात कुठेच पशुसंवर्धन किंवा शेतीचे उल्लेख नाहीत. भारतात केवळ गायच पवित्र कशी आणि गाईपेक्षा अधिक दूध देणारी म्हैस का नाही याचेही स्पष्टीकरण नाही. कदाचित म्हैस काळी म्हणून ती पवित्र नाही. पण ती पांढरे दूध देते ते चालते. गो रक्षेची संवैधानिक तरतूद आहे, पण म्हशींसाठी नाही. कारण आपल्या देशात केवळ गोरे म्हणजे राष्ट्रवादी समजले जातात. काळे नाही!
शेफर्ड जमात ही बीरप्पा म्हणून ओळखली जाते. हरप्पा, अयप्पा, हडप्पा संस्कृती नष्ट केली गेली आणि केवळ वैदिक संस्कृती थोपली गेली. या संस्कृतीत गाव, शहरे याचे निर्माण नाही. केवळ गाई. आमचे पूर्वज फक्त गुलाम बनून राहिले. वेदांच्या मते फक्त ब्राह्मण आणि क्षत्रियांना वाचण्याचा अधिकार होता. गुप्त हे पहिले बनिया राज्यकर्ते. पण त्यांच्या काळात धन पुरून ठेवले जात असे. ते शेती किंवा शहरांत गुंतवले जात नसे. भारत विकसित झाला नाही याला हे धनसंचय कारण ठरले आहे. त्या उलट युरोपने भरभराट केली.
शूद्र संस्कृती ही मांसाहारी आहे. हडप्पा संस्कृतीत सर्व जण मांस भक्षण करीत. सरदार पटेलांनी शूद्रांचा काही विचारच लिहून ठेवला नाही त्यामुळे आपल्याला आंबेडकरांवरच अवलंबून राहावे लागते, असेही इलय्या म्हणाले.
चीनने 3000 वर्षाच्या आपल्या सर्व जाती जमातींचा इतिहास लिहून ठेवला आहे. त्यांना कन्फ्युसियसपासून स्वत:ची राष्ट्रीय भाषा आहे. भारतात बहुतेक ठिकाणी शूद्र आणि दलितांत तंटे आहेत. जे गावात राहातात आणि जे विमानात फिरतात त्यांच्यात कोणतेही वाद नाहीत. इंग्रजीत एकही शूद्र लेखक नाही असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
भारतात दलित १६.५ टक्के तर शूद्र ५६ टक्के आहेत. पण या सर्वात मोठय़ा जमातीला स्वत:ची राष्ट्रीय भाषा नाही.
शूद्रांचा राष्ट्रवादी विचार दलितांबरोबर तंटे करून निर्माण होऊ शकणार नाही. शूद्रांनी दलितांना सोबत घेऊन हा विचार विकसित केला पाहिजे. त्यासाठी इंग्रजीची कास धरली पाहिजे. तरच हे शक्य आहे.
देवाने सर्वाना समान बनविले असले तरी धार्मिक साहित्याचा अर्थ लावण्याचे, पौरोहित्य करण्याचे अधिकार, देवांची व्याख्या, देवांशी बोलण्याचा अधिकार फक्त उच्च वर्णियांनाच आहे. आंबेडकरांमुळे दलित बौद्ध झाल्यानंतर किमान नागरिक म्हणून तरी मान मिळवू शकले.
पटेल शूद्र विचार रुजवू शकले नाहीत. आंबेडकरांनी विपुल लिखाण केले आहे. त्यामुळे ते काही वेळा अडचणीचे ठरतात. पटेल केवळ लोहपुरुष बनून राहिले. गांधी महात्मा झाले, नेहरू पंडितजी झाले. त्यांची लेबले आणि त्यासाठीचे युक्तिवाद. शूद्रांनी लोहपुरुष होऊ नये. त्यांनी लेखक व्हावे. आपल्या कुटुंबाचा इतिहास, आत्मचरित्रे लिहावीत. गावातील ऐतिहासिक उत्पादन शास्त्राबद्दल लिहावे असे सांगून ते म्हणाले की समाज जातविरहित बनला पाहिजे, श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि त्याची शिकवण शाळेतूनच दिली गेली पाहिजे.
स्वच्छ भारत आणि दुटप्पीपणा
स्वच्छ भारत ही कल्पना देशातील महिलांनी उचलून धरली आहे. घर असो किंवा बाहेर त्याच स्वच्छतेचे काम करत असतात. पण एका बाजूला स्वच्छ भारतबद्दल बोलत असताना दुस-या बाजूला मात्र महिला अपवित्र आहेत असे सांगून त्यांना शबरीमालामधील अयप्पा मंदिरात प्रवेश रोखायचा हा दुटप्पीपणा नाही का? हे देवाने केलेले नाही तर उजव्या विचारसणीतून आलेले आहे.