एका तासासाठी गोवा विमानतळावरील धावपट्टीच्या ‘सिग्नल लाईट्स’ पडल्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 09:25 PM2021-11-19T21:25:55+5:302021-11-19T21:26:11+5:30
गोव्याच्या दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवरील ‘सिग्नल लाईट्स’ मध्ये तांत्रित बिघाड झाल्याने शुक्रवारी (दि.१९) संध्याकाळी त्या अचानक बंद पडल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वास्को: गोव्याच्या दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवरील ‘सिग्नल लाईट्स’ मध्ये तांत्रित बिघाड झाल्याने शुक्रवारी (दि.१९) संध्याकाळी त्या अचानक बंद पडल्या. ‘सिग्नल लाईट्स’ चालू झाल्या नसल्यास रात्रीच्यावेळी दाबोळीवर प्रवासी विमान वाहतूक होऊ शकणार नसल्याने नौदलाच्या कर्मचाºयांनी त्या चालू करण्याच्या कामाला त्वरित सुरवात केली. एका तासानंतर निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर करून दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवरील ‘सिग्नल लाईट्स’ पुन्हा चालू केल्यानंतर येथील प्रवासी विमान वाहतूक सुरळीत झाली.
याबाबत माहीतीसाठी दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांना संपर्क केला असता संध्याकाळी ६.१५ च्या सुमारास तांत्रिक बिघाड दूर करून ‘सिग्नल लाईट्स’ चालू केल्याचे त्यांनी सांगितले. ‘सिग्नल लाईट्स’ मध्ये शॉर्ट सरकीट झाल्याने संध्याकाळी ५.१५ च्या सुमारास त्या बंद पडल्या होत्या. नौदलाच्या संबंधित अधिकाºयांनी त्वरित पावले उचलून निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर करून ‘सिग्नल लाईट्स’ चालू केल्या. ‘सिग्नल लाईट्स’ बंद पडल्यामुळे विमान वाहतूकीवर जास्त परिणाम झालेला नसून फक्त काही विमानांना काही मिनीटांचा उशिर झाल्याची माहीती गगन मलिक यांनी दिली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार शुक्रवारी रात्री दाबोळी विमानतळावर देशातील विविध भागातून २४ विमाने येणार असून २४ विमाने प्रवाशांना घेऊन जाणार आहे. ‘सिग्नल लाईट्स’ चालू झाल्या नसल्यास संध्याकाळी ६.३० नंतर दाबोळीवर विमाने उतरू शकत नसल्याची माहीती दुसºया राज्यातून दाबोळी विमानतळावर येणार असलेल्या विमानांना त्वरित देण्यात आले. ‘सिग्नल लाईट्स’ पुन्हा सुरळीत चालू झाल्यानंतर विमाने दाबोळीवर उतरू शकत असल्याची माहीती दिल्यानंतर विविध राज्यातून दाबोळीवर येणार असलेल्या विमाने यायला सुरू झाल्याची माहीती विश्वसनीय सूत्रांनी दिली. काही विमानांना काही मिनिटांचा उशिर वगळता दाबोळी विमानतळावरील प्रवासी विमान वाहतूक सुरळीत झाल्याची माहीती सूत्रांनी दिली.