गोव्यापेक्षा सिल्वासा महाग ! सिने निर्मात्यांनी गोव्यातून बस्तान हलवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 03:13 PM2021-05-11T15:13:40+5:302021-05-11T15:14:33+5:30
दमणला 'लोकेशन'साठी स्पर्धा व भाववाढ
पणजी : गोवा मनोरंजन संस्थेने महामारीच्या पार्श्वभूमीवर अचानक सिनेमा तसेच वेगवेगळ्या चॅनलवरील मालिकांच्या गोव्यात चालू असलेल्या चित्रीकरणाचे सर्व परवाने रद्द केले आहेत. त्यामुळे, सिने निर्मात्यांनी गोव्यातून सिल्वासा, दमणकडे बस्तान हलविले खरे, परंतु तेथे लोकेशनसाठी मागणी वाढल्याने प्रचंड भाववाढ झाली आहे. या दरवाढीचा फटका निर्मात्यांना बसत आहे.
गोव्यात गेले काही दिवस मुंबई, पुणे येथील अनेक सिने निर्माते तसेच वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवर दाखवल्या जाणाऱ्या मालिकांचे चित्रीकरण चालले होते. कोरोना महामारीमुळे मनोरंजन संस्थेने या सर्व चित्रीकरणांचे परवाने रद्द केले. त्यानंतर, निर्मात्यांनी दादरा, नगर हवेली, सिल्वासा-दमणला आपला मोर्चा वळविला. कोविड महामारीच्या या काळात देशात ज्या काही मोजक्याच ठिकाणी चित्रीकरणाला परवानगी आहे. त्यात सिल्वासा, दमणचा समावेश आहे. त्यामुळे निर्मात्यांनी तेथे गर्दी केलेली आहे.
सोनी मराठी चॅनलवरील 'आई माझी काळुबाई' या मालिकेचे चित्रीकरण करण्यासाठी निर्मात्या अलका कुबल चमूसह गोव्यात आल्या होत्या. परंतु, त्यांनाही गोव्यातून माघारी जावे लागले. त्या म्हणाल्या की, सिल्वासा येथे लोकेशनसाठी प्रचंड स्पर्धा असून भाववाढ झालेली आहे. अक्षरशः लुटालूट चालू असल्याचे त्यांनी म्हटले.
स्टार प्लस हिंदी चॅनलवरील 'ये है चाहतें', 'शौर्य और अनोखी की कहानी', 'आप की नजरोंनें समझा' तसेच 'गुम है किसी के प्यार में' तर मराठी स्टार प्रवाह चॅनलवरील 'सुख म्हणजे नक्की काय असते', 'रंग माझा वेगळा,' झी मराठीवरील 'अगंबाई, सुनबाई', तसेच कलर्स मराठीवरील 'ऑनलाइन शुभमंगल', सोनी मराठीवरील 'आई माझी काळुबाई', या मालिकांचे चित्रीकरण गोव्याच्या वेगवेगळ्या ग्रामीण भागात चालू होते. या मालिकांच्या निर्मात्यांनी चित्रीकरणासाठी सध्या सिल्वासा दमणला तळ ठोकल्याने तेथे लोकेशनची मागणी वाढली आहे. व्हिल्ला किंवा बंगले असलेल्यांची चित्रीकरणासाठी देण्याच्याबाबतीत चांगलीच चांदी झालेली आहे.