सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या रुग्णांना गोमेकॉत महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचा लाभ मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 01:18 PM2018-12-11T13:18:41+5:302018-12-11T13:28:26+5:30
पणजी शेजारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीहून गोमेकॉत वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना सध्या शुल्क भरावे लागते. परंतु नजीकच्या काळात महाराष्ट्र सरकारच्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेंतर्गत रुग्णांची या शुल्कातून सुटका होईल.
पणजी - पणजी शेजारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीहून गोमेकॉत वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना सध्या शुल्क भरावे लागते. परंतु नजीकच्या काळात महाराष्ट्र सरकारच्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेंतर्गत रुग्णांची या शुल्कातून सुटका होईल. महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी नुकतीच गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची भेट घेऊन या अनुषंगाने चर्चा केली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी किंवा महाराष्ट्राच्या अन्य भागातील कोणी रुग्ण उपचारासाठी गोमेकॉत आल्यास खचार्चा पूर्ण परतावा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारची पूर्वी राजीव गांधी आरोग्यदायी योजना होती. या योजनेचे नामांतर आता महात्मा फुले आरोग्यदायी योजना असे केलेले आहे.
गोमेकॉत सध्या परप्रांतीय रुग्णांना गोवा सरकारच्या दयानंद स्वास्थ विमा योजनेंतर्गत ‘क’श्रेणी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी जेवढे शुल्क आकारले जाते त्याच्या २0 टक्के इतके शुल्क आकारले जाते. उदाहरणार्थ हृदयरोग विषयक कोरोनरी बल्लून अँजिओप्लास्टीला ‘क’ श्रेणी रुग्णालयात १,२७,६५0 रुपये आकारले जातात. गोमेकॉत परप्रांतीयांना केवळ २५,५३0 रुपये आकारले जातील. इतर शस्रक्रियांच्या बाबतीतही याचप्रमाणे वेगवेगळे शुल्क निश्चित करण्यात आलेले आहे. रक्त चाचण्या, अल्ट्रासाउंड, एक्स रे, एमआरआय, सीटी स्कॅन आदींसाठी तसेच वेगवेगळ्या शस्रक्रियांसाठी शुल्क आकारणी सुरु झाली असून खाटेसाठी दिवशी ५0 रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येत आहे.
गेल्या १ जानेवारीपासून हे शुल्क लागू झालेले आहे. गोमेकॉ हे ‘अ’ श्रेणी रुग्णालयातआहे. गोमंतकीयांपेक्षा परप्रांतीयच या रुग्णालयाचा अधिक लाभ घेतात आणि त्याचा आर्थिक बोजा सरकारवर पडते, असे गोवा सरकारचे म्हणणे आहे. शेजारी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच कर्नाटकातील कारवार, कुमठा भागातून वैद्यकीय उपचारांसाठी येथे येणाऱ्यांना आता पैसे मोजावे लागतात. गोमेकॉसह म्हापशाचे जिल्हारुग्णालय, मडगांवचे ऑस्पिसियो रुग्णालय आणि फोंडा येथील सरकारी रुग्णालयांमध्येही हे शुल्क लागू झालेले आहे.
स्थानिक गोमंतकीयांनी सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येताना दीनदयाळ आरोग्य विमा योजनेंतर्गत देण्यात आलेले कार्डसोबत आणावे लागते. दरम्यान, गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याशी संपर्क साधला असता केसरकर यांनी हा प्रस्ताव मांडल्याच्या वृत्तास त्यानी दुजोरा दिला ते म्हणाले की, गोव्याच्या आरोग्य विमा कार्डांप्रमाणे त्यांनी त्यांच्या राज्याच्या आरोग्य कार्डांचा उपयोग करावा त्यासाठी गोमेकॉत कक्ष उघण्याची आमची तयारी आहे. बेळगांवला केएलई रुग्णालयात जाणाऱ्या गोमंतकीय रुग्णांनाही तेथे काउंटर उघडून अशीच व्यवस्था करण्यात आलेली आहे.