साहेब, तुम्ही परत या; गोव्यातील राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे पवारांना पत्र
By किशोर कुबल | Published: May 3, 2023 06:43 PM2023-05-03T18:43:53+5:302023-05-03T18:44:36+5:30
पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी ही विनवणी आहे.
पणजी : ‘साहेब, तुम्ही परत या’, अशी विनवणी करणारे पत्र गोव्यातील राष्ट्रवादी कॅांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी शरद पवार यांना लिहिले आहे. पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी ही विनवणी आहे.
जुझे फिलीप यांनी पत्रात असे म्हटले आहे कि,‘ तुम्ही पक्षाध्यक्षपदाचा राजिनामा देण्याचा घेतलेला निर्णय आमच्यासाठी वेदनादायी आहे. तुमच्याशिवाय राष्ट्रवादीचा आम्ही विचारच करु शकत नाही. तुमच्या राजिनाम्यामुळे पक्षात निर्माण झालेल्या पोकळीने गोवा राष्ट्रवादी दिशाहिन बनला आहे. तुमचे दूरदृष्टी नेतृत्त्व केवळ राष्ट्रवादीलाच नव्हे, तर संपूर्ण देशवासीयांना हवे आहे. राष्ट्रवादीची गोवा प्रदेश कार्यकारिणी तसेच तमाम गोवेकर तुम्हाला राजीनाम्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती करीत आहे.’
दरम्यान, पक्षाचे गोवा प्रभारी तथा राष्ट्रीय प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांच्याशी या प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले की,‘ पवारसाहेबांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आमच्यासाठी धक्कादायक आहे. ते असे काही पाऊल उचलतील याची सुतराम कल्पना आम्हाला नव्हती. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती आम्ही सर्वांनीच केली आहे. गोवा प्रदेशाध्यक्षांनी माझ्याशी संपर्क साधला. पवारांना पत्र लिहून राजीनामा मागे घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.’