गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार सहा जादा रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 09:38 AM2023-06-26T09:38:04+5:302023-06-26T09:39:37+5:30
गणेश चतुर्थीसाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी सहा विशेष रेल्वे धावणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव: गणेश चतुर्थीसाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी सहा विशेष रेल्वे धावणार आहेत. रेल्वे क्रमांक ०११७१ ही छत्रपती शिवाजी टर्मिनल्सहून १३ सप्टेंबर व २ ऑक्टोबरला ००.२० सुटून त्याच दिवशी दुपारी अडीच वाजता सावंतवाडी येथे पोहचेल. तर गाडी क्रमांक ०११७२ ही गाडी १३ सप्टेंबर व २ ऑक्टोबरला सावंतवाडी येथून १५.१० वाजता सुटणार व दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता मुंबईला पोचणार आहे.
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावरडा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलेवाडा, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नंदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग व कुडाळ स्थानकावर थांबा घेईल. या गाडीला २० डबे आहेत. गाडी क्रमांक ०११५३ ही १३ सप्टेंबर व २ ऑक्टोबरला दिवा जंक्शनहून ०७.१० वाजता सुटून त्याच दिवशी रत्नागिरीला १४.५५ वाजता पोहचेल. तर गाडी क्रमांक ०११५४ वरील दिवशीच रत्नागिरीहून १५.४० वाजता सुटून त्याच दिवशी २२.४० वाजता दिवा जंक्शनला पोहचणार आहे. या गाडीला १२ डबे आहेत. रोहा, माणगाव, वीर खेड, चिपळूण, सावरडा, अरावली रोड व संगमेश्वर रोड येथे ही गाडी थांबा घेईल.
गाडी क्रमांक ०११६७ ही सप्टेंबर महिन्याच्या दि. १३, १४, १९, २०, २१, २४, २५, २६, २८ व ऑक्टोबर महिन्याच्या १ व २ तारखेला लोकमान्य टिळक टर्मिनल्सहून २२.१५ वाजता सुटणार व दुसऱ्या दिवशी ०९.३० वाजता कुडाळ येथे पोहचेल तर गाडी क्रमांक सप्टेंबर १४, १५, २०, २१, २२, २५, २६, २७, २८, २९ व ऑक्टोबर महिन्याच्या दि. २ व ३ तारखेला कुडाळहून १०.३० वाजता सुटून त्याच दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनल्स येथे २१.५५ वाजता पोहचेल. या गाडीला २० डबे आहेत. ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावरडा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली व सिंधुदुर्ग स्थानकावर थांबेल.
गाडी क्रमांक ०११६९ सप्टेंबर महिन्याच्या दि. १५,२२,२९ तारखेला पुणे जंक्शनहून १८.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी करमली स्थानकात १०.०० वाजता पोहचेल. तर गाडी क्रमांक ०११७० सप्टेंबरच्या १७,२४ व १ ऑक्टोबरला कुडाळ येथून १६.०५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पुणे येथे ०५.५५ वाजता पोहचणार आहे. या गाडीला २२ डबे आहेत.
गाडी क्रमांक ०११८७ करमली स्थानकावरुन १६,२३ व ३० रोजी करमली येथून १४.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पनवेलला ०२.४५ वाजता पोहचणार. गाडी क्रमांक ०११५१ ही श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथून १३ सप्टेंबर व २ ऑक्टोबरला ११.५० वाजता सुटणार व दुसऱ्या दिवशी मडगाव येथे ०२.१० वाजता पोहचेल तर गाडी क्रमांक ०११५२ ही १४ सप्टेंबर व ३ ऑक्टोबरला मडगावहून ०३.१५ वाजता सुटून त्याच दिवशी मुंबईला १७.०५ वाजता पोहचणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.