मडगाव परिसरात सहा घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:10 AM2017-07-19T02:10:00+5:302017-07-19T02:18:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कमडगाव : धार्मिक स्थळांच्या विटंबना प्रकरणात फ्रान्सिस्को परेरा याला अटक केल्यानंतर गोवा पोलिसांनी काहीसा सुटकेचा नि:श्वास
लोकमत न्यूज नेटवर्क
मडगाव : धार्मिक स्थळांच्या विटंबना प्रकरणात फ्रान्सिस्को परेरा याला अटक केल्यानंतर गोवा पोलिसांनी काहीसा सुटकेचा नि:श्वास सोडला होता; मात्र विधानसभा अधिवेशन सुरू झालेले असताना मडगावात तीन कार्यालये व दोन फ्लॅट फोडण्याच्या तसेच नेसाय येथेही एक फ्लॅट फोडण्याची घटना घडल्याने पोलीस पुन्हा एकदा दबावाखाली आले आहेत. नेसाय येथील फ्लॅट व कार्यालयामध्ये चोरांच्या हाती काहीच लागू शकले नाही. या संदर्भात मडगाव पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता, चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले.
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बोर्डा येथील पीडब्ल्यूडी क्वॉर्टर्सजवळ या घटना घडल्या. यापूर्वी याच ठिकाणी चोरांनी सहा फ्लॅट फोडले होते. सोमवारी रात्री चोरी करण्यापूर्वी चोरांनी बाकीच्या सर्व फ्लॅटना बाहेरून कडी लावून ठेवल्याने चोर पळत जात असल्याचे पाहूनही त्यांना बाहेर येऊन अडविणे शक्य झाले नाही.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, सोमवारी रात्री पाऊस पडत होता. त्याचा फायदा घेऊन चोरांनी हा प्रयत्न केला. पीडब्ल्यूडी खात्याची तीन कार्यालये फोडण्याबरोबरच जवळ असलेल्या क्वॉर्टर्समधील एक बंद फ्लॅट फोडण्यात आला; मात्र या कार्यालयात चोरांच्या हाती काहीच लागू शकले नाही, तर दुसऱ्या बंद फ्लॅटमध्येही घरात केवळ कपडेच असल्याने मोठा ऐवज त्यांना मिळाला नाही. याच चोरांनी आणखी एक फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न केला असता, त्यावेळी झालेल्या आवाजाने जवळच्या फ्लॅटमधील एक महिला जागी झाली. तिने फोनवरून इतरांना सतर्क केले; मात्र बाहेरून कडी घातलेली असल्यामुळे ते बाहेर येऊ शकले नाहीत. लोकांनी फोनवरून पोलिसांशी संपर्क साधला;
मात्र पोलीस सायरन वाजवीत घटनास्थळी दाखल झाल्याने त्या आवाजाने सतर्क झालेल्या चोरांनी तेथून पळ काढला. हाफ चड्डीतील एकूण सहाजण धावत असल्याचे लोकांनी पाहिले, अशी माहिती फ्लॅटमधील काहींनी दिली.
नेसाय येथेही अशाचप्रकारे एक बंद फ्लॅट फोडण्यात आला; मात्र घरमालक परदेशात असल्याने नेमका किती ऐवज चोरीस गेला, याची माहिती मिळू शकली नाही. मडगावचे पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पोलीस घटनास्थळी पोचून १५ मिनिटे उलटली, तरी कोणी बाहेर न आल्याने नेमकी कुठे चोरी झाली, याची माहिती मिळू शकली नाही; मात्र या चोरीत कुठलाही ऐवज चोरीला गेलेला नाही.