'दृष्टी' जीवरक्षकांकडून ईस्टरच्या आठवड्यात सहा जणांना जीवनदान
By समीर नाईक | Published: April 2, 2024 03:43 PM2024-04-02T15:43:26+5:302024-04-02T15:46:13+5:30
ईस्टरच्या आठवड्यादरम्यान दृष्टी जीवरक्षकांनी राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावर सहा जणांना बुडण्यापासून वाचवले
समीर नाईक, पणजी : ईस्टरच्या आठवड्यादरम्यान, दृष्टी जीवरक्षकांनी राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावर सहा जणांना बुडण्यापासून वाचवले. तसेच जीवरक्षकांनी एकाला आत्महत्या करण्यापासून रोखले. याच आठवड्यात हरवलेल्या मुलाचे सुद्धा एक प्रकरण होते, त्याला देखील यशस्वीपणे त्याच्या पालकांकडे सोपवीण्यात आले.
मुंबईतील ३२ वर्षीय व्यक्तीला आगोंदा येथील समुद्रकिनाऱ्यावरील खडकाळ भागाजवळ मोठ्या लाटेत फसलेले दिसत असताना जीवरक्षक सत्यवान वेळीपने त्वरीत घटनास्थळी पोहचत त्याला वाचवले. मुंबई स्थित या पर्यटकाला जेटस्की आणि रेस्क्यु ट्यूबच्या मदतीने सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले.
कोलकत्ता येथील एका ४७ वर्षीय महिलेला बाणावली समुद्रकिनाऱ्यावर वाचवण्यात आले. ती महिला पाण्यात गटांगाळे खात असल्याचे पाहताच जीवरक्षक गुतेश गावकर यांनी तिच्याशी धाव घेत, रेस्क्यू ट्यूबचा वापर करून तीला वाचविण्यात आले.
पालोळे समुद्रकिनाऱ्यावर, २४ वर्षीय हैद्राबाद येथील युवक किनारपट्टीपासून सुमारे ७०० मीटर अंतरावर कयाकिंग करत असताना बुडण्याचा प्रकार घडला. हे पाहताच एका सतर्क जेट स्की ऑपरेटर सावध झाला आणि त्याला सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आले. खोला नदीवर देखील अशाच एका घटनेत, बेंगळुरूमधील दोन पुरुष, दोघेही वयाने ३२, कायाकिंग करताना पाण्यात पडले, जीवरक्षक महेश वेळीप याने सर्फबोर्डच्या मदतीने पाण्यात धाव घेत त्यांना वाचवले.
- कोलवा किनाऱ्यावर आत्महत्येचा प्रयत्न
कोलवा किनाऱ्यावर एक लहान मुल हरवण्याचे प्रकरण घडले, तसेच एकाने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला. पालक पोहण्यात व्यस्त होते, त्यात एक जीवरक्षकाला त्रस्त मुल समुद्रकिनाऱ्यावर भटकताना दिसले, विचारपूस केल्यानंतर सदर मुल हरविल्याचे कळाले. जिवरक्षकानी लगेच जीपमधून घोषणा दिल्या. पालक सापडल्यानंतर आणि त्यांची ओळख पटल्यानंतर मुलाला ताब्यात देण्यात आले.
तसेच याच किनाऱ्यावर आत्महत्येच्या प्रयत्न्यात असलेल्या युवकाला वाचवण्यात आले. सदर युवक आत्महत्येच्या प्रयत्नात असताना जीवरक्षक शंकर पर्येकर याने त्याला वाचविले. नंतर पर्येकर यांनी त्याला शांत करून जवळच्या टॉवरवर नेले आणि पाणी दिले. दरम्यान पर्येकर यांनी पोलिसांना बोलवत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.