बांबोळीत २ सिलिंडराचा स्फोट, झोपडपट्टीला भीषण आग; जीवितहानी नाही
By समीर नाईक | Updated: May 14, 2024 15:36 IST2024-05-14T15:34:46+5:302024-05-14T15:36:13+5:30
गोवन रियल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट कंपनीचा नवा प्रकल्प येत असल्याने या भागात प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांसाठी सुमारे १४० झोपड्या राहण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या.

बांबोळीत २ सिलिंडराचा स्फोट, झोपडपट्टीला भीषण आग; जीवितहानी नाही
पणजी: बांबोळी येथील आलदिया दी गोवाच्या परिसरात असलेल्या कामगारांच्या तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या झोपड्यांना आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. दोन एलपीजी सिलिंडराचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहचत स्थिती नियंत्रणात आणली.
गोवन रियल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट कंपनीचा नवा प्रकल्प येत असल्याने या भागात प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांसाठी सुमारे १४० झोपड्या राहण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या. दोन एलपीजी सिलिंडराचा स्फोट होताच १४० पैकी सुमारे १२-१५ झोपड्या जळून खाक झाल्या. या ठिकाणी आणखी ३ दोन एलपीजी सिलिंडर सापडले होते, जे नंतर अग्निशामक दलातर्फे सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
दरम्यान जेव्हा ही घटना घडली तेव्हा या झोपड्यांमध्ये कुणीच नव्हते, त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण एकंदरीत सुमारे ४०,००० रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळी सुमारे १०.४४ वाजता पणजी अग्निशामक दलाला या घटने संदर्भात कॉल आला होता. दलाने तत्परता दाखवत सुमारे ११ वा. घटनास्थळी दाखल होत, स्थिती नियंत्रणात आणली. यासाठी सुमारे दीड तास त्यांना लागला. तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी पणजी अग्निशामक दलाचा एक आणि पणजी मुख्यालयाच्या एक पंप असे मिळून दोन पंप पाणी लागले. तसेच त्या ठिकाणी २ टाकी पाणी कंपनीकडून उपलब्ध करण्यात आले होते, त्याचाही वापर करण्यात आला. पणजी अग्निशामक दलाचे स्टेशन अधिकारी रुपेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कारवाई पार पडली.