स्मार्ट सिटी कामांच्या विलंबासाठी माफी मागतो, ३१ मेपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा: बाबूश मोन्सेरात
By पूजा प्रभूगावकर | Published: April 7, 2024 02:24 PM2024-04-07T14:24:50+5:302024-04-07T14:25:26+5:30
"जुन्या शहराचा विकास करायचा असल्यास जुन्या गोष्टी खोदून बाजूला करुन विकास करावा लागतो, त्यात वेळ जाणारच"
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: स्मार्ट सिटीची कामे पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने आपण जनतेची माफी मागतो. ३१ मे पर्यंत ही सर्व कामे पूर्ण होतील अशी अपेक्षा असल्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी म्हटले आहे. स्मार्ट सिटीच्या कामांमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे, हे आपल्याला माहित आहे. या कामांबाबत लोकांच्या सहनशीलतेचे आपल्याला कौतुक आहे. मात्र त्याचबरोबर ही कामे वेळेत पूर्ण झाली नाही. कामे पूर्ण होण्यास उशीर होत असल्याने आपण माफी मागतो. ३१ मे या दिलेल्या डेडलाईन मध्ये कामे पूर्ण होण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
बाबूश म्हणाले, की पणजी शहर हे जुने शहर आहे. नवी शहर बनवायचे असल्यास कामे त्वरित होतात. मात्र जुन्या शहराचा विकास करायचा असल्यास जुन्या गोष्टी खोदून बाजूला करुन विकास करावा लागतो. त्यात वेळ जाणारच. त्यामुळे लोकांना सहन करावे लागते. स्मार्ट सिटीची कामे ही पणजीवासियांच्या फायद्याची तसेच शहराच्या विकासासाठी आहेत.पणजीवासियांना या कामाचा त्रास होत असला तरी जेव्हा कामे पूर्ण होतील तेव्हा ते हा सर्व त्रास विसरतील,असेही त्यांनी नमूद केले.