स्मार्ट बसथांब्यांवर 'बाबूश अस्त्र'; कंत्राटदाराकडून काम काढून घेण्याची मुख्यमंत्री सावंत यांनी दिली ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2024 10:32 AM2024-03-15T10:32:09+5:302024-03-15T10:33:13+5:30

स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे या बस थांब्यांच्या दर्जाबद्दल तक्रार केली होती.

smart city bus stands in panaji cm pramod sawant assured to withdraw the work from the contractor | स्मार्ट बसथांब्यांवर 'बाबूश अस्त्र'; कंत्राटदाराकडून काम काढून घेण्याची मुख्यमंत्री सावंत यांनी दिली ग्वाही

स्मार्ट बसथांब्यांवर 'बाबूश अस्त्र'; कंत्राटदाराकडून काम काढून घेण्याची मुख्यमंत्री सावंत यांनी दिली ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :स्मार्ट सिटीच्या बस थांब्याचे काम सध्याच्या कंत्राटदाराकडून काढून घेतले जाईल. स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे या बस थांब्यांच्या दर्जाबद्दल तक्रार केली होती.

काल, मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीला बाबूशही उपस्थित होते. बस थांब्यांचे काम नवीन कंत्रादाराला दिले जाईल, असे बाबूश यांनी सांगितले. या बसथांब्यांच्या बाबतीत मोठा घोटाळा झालेला असून ही निव्वळ लूट असल्याचा आरोप बाबूश मोन्सेरात यांनी केला होता.

मुख्यमंत्री म्हणाले की, काही कामांचा वेग थोडा मंदावला होता तो वाढवण्याचे आदेश मी दिलेले आहेत. कामे ठरल्याप्रमाणे ३१ मेपर्यंत पूर्ण होईल. स्मार्ट सिटीचे सीईओ संजीत रॉड्रिग्स, आयपीएसीडीएलचे कंत्राटदार, अधिकारी, बांधकाम खाते तसेच इतर संबंधितांकडे मुख्यमंत्र्यांनी चर्चा करुन कामांची माहिती घेतली.

शहरात इलेक्ट्रिकल बसगाड्यांची व्यवस्था केली जाणार त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, शहराच्या बाह्य भागात ही बससेवा आधी सुरु केली जाईल. अंतर्गत भागात बसगाड्या चालवणाऱ्या खासगी बसमालकांच्या पोटाआड सरकार येणार नाही. त्यांना तीन पर्याय देण्यात आलेले आहेत.

स्थानिक आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पत्रकारांना सांगितले की, बस थांब्यांबाबत कोणतीही तडजोड करुन चालणार नाही हे मी मुख्यमंत्र्यांना सांगितले. हे बस थांबे प्रवाशांसाठी मुळीच उपयुक्त नव्हते. शहरात ३६ ठिकाणी मनमानीपणे थांबे उभारण्याचे काम सुरु केले. कंत्राटदार पाच बस थांबे प्रायोगिक तत्त्वावर सुरवातीला बांधणार होता. परंतु महापालिकेला विश्वासात घेतलेच नाही. मी विरोध दर्शवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही हे काम कंत्राटदाराकडून काढून घेऊन नवीन कंत्राटदाराकडे देण्याची हमी दिली आहे. महापालिकेकडे बस थांबे उभारण्यासाठी नवीन प्रस्ताव आलेला आहे.

स्मार्ट सिटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट सिटी अंतर्गत मंजूर ९५३.९० कोटी रुपयांची कामे सध्या राजधानी शहरात होत आहेत. लोकांना त्यामुळे गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. मलनिस्सारण वाहिन्या, रस्ते, जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या, गॅस वाहिनी बीएसएनएल लाइन, पदपथ आदी कामे चालली आहेत. 'मेनहोल'च्या कामात अडथळे येत आहेत. काकुलो जंक्शन ते टोक करंझाळे मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम आव्हानात्मक ठरले होते. आठ मिटरपेक्षा जास्त खोल खड़ा खोदल्याने पाणी लागले होते.

काय म्हणाले होते बाबूश

स्मार्ट बस थांबे हा मोठा घोटाळा असून जनतेच्या पैशांची लूट असल्याचा आरोप बाबूश मोन्सेरात यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केला होता. या बस शेड्सचे डिझाइन तसेच तिथे जाहिराती करण्यासंबंधी दिलेले हक्क या सर्व बाबतीत चौकशीची गरज असून त्यासाठी त्वरित बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली होती. या पार्श्वभूमीवर वरील बैठक झाली. बस शेड्सचे डिझाइन पाहता अत्यंत कमी लोक या शेडमध्ये मावतील. बस शेडमधील आसनेही अपुरी व अडचणीची आहेत तसेच छतही मान्सूनमध्ये पावसापासून किंवा उन्हाळ्यात तप्त सूर्य किरणांपासून संरक्षण देऊ शकणार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.

कामाची गती वाढणार

स्मार्ट सिटीची उर्वरित कामे समाधानकारकपणे चालू आहेत. केवळ मल:निस्सारण व्यवस्थेसाठी 'मेनहोल'ची कामे तेवढी संथगतीने चालली आहेत. गती वाढवण्याचे आदेश कंत्राटदारांना दिलेले आहेत. रायबंदर येथे रस्ता बंद करावा लागल्याने होणारे लोकांचे हाल, याबद्दल विचारले असता बाबूश म्हणाले की, थोडी फार कळ लोकांना सोसावीच लागेल.
 

Web Title: smart city bus stands in panaji cm pramod sawant assured to withdraw the work from the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.