'स्मार्ट' प्रदूषणाची न्यायाधीशांकडून पाहणी; प्रशासनाची उडाली तारांबळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2024 08:51 AM2024-04-02T08:51:06+5:302024-04-02T08:52:16+5:30

सीईओंकडून घेतला कामांचा आढावा; उच्च न्यायालयात आज याचिकांवर सुनावणी

smart city panaji pollution examined by mumbai high court at goa judges | 'स्मार्ट' प्रदूषणाची न्यायाधीशांकडून पाहणी; प्रशासनाची उडाली तारांबळ 

'स्मार्ट' प्रदूषणाची न्यायाधीशांकडून पाहणी; प्रशासनाची उडाली तारांबळ 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राजधानी पणजीतील धुळ प्रदूषणाची दखल घेत अखेर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या न्यायधीशांनी स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी केली. स्मार्ट सिटीचे सीईओ संजीत रॉड्रिग्स यांच्याकडून न्यायधीशांनी कामाचा आढावा घेतला. विशेष म्हणजे न्यायधीशांकडून अशा प्रकारे पाहणी करण्याची ही पहिलीच घटना आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामांमुळे निर्माण झालेल्या धुळ प्रदूषणाविरोधात नागरिकांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयात आज, मंगळवारी २ रोजी सुनावणी होणार आहे. या याचिकांची गंभीर दखल घेऊन न्यायाधीशांनी सांतिनेझ जंक्शन, हिरो शोरुम, १८ जून मार्ग या परिसरात पाहणी केली. यावेळी सीईओ रॉड्रिग्स यांच्याकडून त्यांनी किती टक्के काम पूर्ण झाले, कामाची स्थिती, कधीपर्यंत काम पूर्ण होईल आदी माहिती दिली.

...रस्ते धुतले

न्यायधीश पाहणी करणार असल्याने शहरातील अनेक रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. पाण्याचे टँकर मागवून चक्क रस्ते धुवून काढले. पणजी मार्केट परिसराप्रमाणे अनेक भागांत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जेणे करुन या कामांमुळे होणारे धुळ प्रदूषण न्यायधीशांच्या नजरेस पडू नये. तसेच अनेक भागांमध्येही स्मार्ट सिटीचे काम बंद ठेवले होते. यावरुन या पाहणीवरुन प्रशासनाचा उडालेला गोंधळ स्पष्ट दिसून येत होता.

कठोर शिक्षा करा: काकुलो

स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्यासाठी ३१ में ही डेडलाईन आहे. मात्र जर डेडलाईन पाळली नाही, तर स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आपण न्यायधीशांकडे केली आहे. या कामांमुळे लोकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यांना भाडे भरणेही मुश्किल बनत आहे. दोन वर्षांपासून या कामांच्या नावाखाली रस्ते खोदले जात आहेत. एकही रस्ता धड नसून वाहतुकीसाठी रस्ते बंद आहेत. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून न्यायालय योग्य ते निर्देश देतील, अशी अपेक्षा उद्योजक मनोज काकुलो यांनी व्यक्त केली.

सीईओ भडकले

न्यायधीश कामांची पाहणी करणार असल्याने रस्ते धुतले का? असा प्रश्न करताच स्मार्ट सिटीचे सीईओ संजीत रॉड्रिग्स चांगलेच भडकले. आम्ही नियोजनानुसार सर्व कामे करीत आहोत. न्यायधीश  येणार म्हणून रस्ते धुहले नाहीत. पुरावे असले तरच आरोप करावेत, असेही ते म्हणाले. यावेळी उद्योजक मनोज काकुलो, सामाजिक कार्यकर्ते महेश म्हांग्रे व अन्य काही नागरिकांनी कामांबाबत न्यायाधीशांकडे चिंता व्यक्त केली. तसेच नागरिकांना कसा त्रास सहन करावा लागत आहे, धूळ प्रदुषणामुळे लोकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हे त्यांनी त्यांच्या नजरस आणून दिले.
 

Web Title: smart city panaji pollution examined by mumbai high court at goa judges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.