स्मार्ट सिटीचे गौडबंगाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 12:44 PM2023-05-25T12:44:41+5:302023-05-25T12:45:43+5:30
पणजी शहर येत्या पावसाळ्यात बुडणार याची कल्पना सरकारला आली आहे.
जहाज बुडू लागले की, सर्वप्रथम उंदीर बाहेर उड्या टाकू लागतात. पणजी शहर येत्या पावसाळ्यात बुडणार याची कल्पना सरकारला आली आहे. सरकारमधील काही घटकांनी ओरड सुरू केली आहे. जहाजाचे कप्तान म्हणजे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना वाऱ्याची दिशा कळली आहे. त्यामुळे त्यांनी संजीत रॉड्रिग्ज या अधिकाऱ्याकडे स्मार्ट सिटी प्रकल्पाची धुरा सोपवली आहे. संजीतची नियुक्ती ही आता शेवटच्या टप्प्यात झाली आहे. एखादा रुग्ण मरणार याची कल्पना आल्यानंतर खास विमान पाठवून स्पेशालिस्ट बोलवला जातो, तसा काहीसा प्रकार संजीतबाबत सरकारने केला आहे.
रॉड्रिग्ज यांना पणजी शहराची बरीच माहिती आहे. आता पावसाळ्यात पणजी बुडणार व लोक आपल्या नावाने शंख करणार याची कल्पना येताच संजीतला पाचारण केले गेले. शहर मरणाच्या दारात उभे असताना केवढेही तज्ज्ञ किंवा डॉक्टर्स बोलवले तरी शहराचा जीव वाचेलच याची हमी देता येत नाही. काल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पहिला बॉम्ब टाकला. स्मार्ट सिटीची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत, असा दावा करत सल्लागारांच्या नावाने त्यांनी बॉम्ब फोडला. स्मार्ट सिटीच्या सल्लागाराला काहीही ज्ञान नाही; पण त्याला आठ कोटी रुपये सरकारकडून फेडले जात असल्याचा दावा बाबूशने केला आहे. मोन्सेरात पणजीचे आमदार आहेत. ते स्मार्ट सिटी प्रकल्पाचे संचालकही आहेत. त्यांनी सल्लागाराला दोष दिला म्हणजे त्यांची जबाबदारी संपली, असा अर्थ होत नाही. पणजीची आज जी प्रचंड दुर्दशा झालेली आहे, त्याविषयी नागरिक बाबूश मोन्सेरात आणि पणजी महापालिकेवरही तेवढेच नाराज आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी खरे म्हणजे अगोदरच पणजीकडे लक्ष द्यायला हवे होते.
सावंत व मोन्सेरात या दोघांनीही मिळून सातत्याने पणजीत फिरून दुर्दशा पाहायला हवी होती. मात्र, बांधकाममंत्री नीलेश काब्राल असोत, मुख्यमंत्री असोत किंवा आमदार मोन्सेरात असोत, तिन्ही नेते पणजीविषयी गंभीर नव्हतेच. एक वर्षापेक्षा जास्त काळ पणजी सगळीकडे फोडून ठेवली गेली आणि गोव्यात सरकारच अस्तित्वात नसल्यासारखी स्थिती पणजीवासीयांनी अनुभवली. मनोहर पर्रीकर यांनी ज्या पणजी शहराचे अनेक वर्षे नेतृत्व केले, त्या शहराच्या वाट्याला आज नरकयातना आल्या आहेत. पणजीतील दुकानदार, मोठे व्यापारी, छोटे हॉटेल व्यावसायिक, हार्डवेअर विक्रेते यांचे धंदे ठप्प झाले आहेत. ग्राहक दुकानात येऊच शकत नाहीत. वाहन कुठे पार्क करावे, असा प्रश्न लोकांना पडतो. महापालिकेच्या पार्किंग कंत्राटदाराचा मीटर मात्र सुरूच आहे. पणजीत पाणी तुंबले तर आपण नव्हे, अभियंते जबाबदार असतील; असे विधान गेल्या महिन्यात मोन्सेरात यांनी केले होते. तेच विधान नंतर महापौर रोहित मोन्सेरात यांनी केले. काब्राल यांनीही हात झटकले आहेत.
मनोज काकुलो यांच्यासारखा उद्योगपतीही सातत्याने पणजीची दुर्दशा जाहीरपणे मांडत आला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यानंतरच परवा रात्रीच्यावेळी स्मार्ट सिटी कामांची पाहणी केली. पणजीत बाहेरून येणारे मोठे ट्रक रस्त्यात मध्येच रुततात किंवा कलंडतात. गटारे भरलेली आहेत. फुटपाथ फोडलेले आहेत. ठीक केलेले रस्ते पुन्हा फोडले जातात, पणजीतील भाजप कार्यकर्ते, नागरिक वगैरे पूर्वी आंदोलने करायचे, मात्र, आता अनेक जण सत्तेच्या मखमली, मऊशार गादीचा अनुभव घेत आहेत. पव्यावसायिक बोलण्यास घाबरतात. येत्या पावसाळ्यात सगळीकडे पाणी तुंबणार हे लोकांना ठाऊक झाले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी आता ब्लेम गेम सुरू केला आहे.
राज्याचे मुख्य सचिव श्री गोयल हे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे चेअरमन आहेत. मात्र, केबिनमधून बाहेर येऊन त्यांनी कधी पणजीची गंभीरपणे पाहणी केली असे दिसलेच नाही. पणजीतील नगरसेवकांनी तोंडाला कुलूप लावले आहे परिणाम लोकांनाच भोगावे लागतील. कारण १५ जूनपर्यंत पणजीतील कामे पूर्ण होणारच नाहीत, पावसाचा जोर वाढल्यानंतर रस्ते पाण्याखाली गेले की, मग जहाज पूर्ण बुडालेच म्हणून लोकांनी समजावे. सरकार त्यावेळी मदतीला येणार नाही. आपण अगोदरच अभियंत्यांचा दोष म्हणून सांगितले होते, असे बाबूश मोन्सेरात पावसाळ्यात नव्याने बोलतील. स्मार्ट सिटीचे कॅमेरे, स्मार्ट सिटीची कामे वगैरे सगळेच गौडबंगाल आहे, हे वेगळे सांगायला नको.