सारीपाट: शहर कोण वाचवणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 10:47 AM2023-05-28T10:47:35+5:302023-05-28T10:49:39+5:30
पावसाळ्यात पणजीचे आणखी दशावतार झाले तर लोक सरकारला माफ करणार नाहीत.
- सद्गुरू पाटील
शहरभर स्मार्ट सिटीचे काम सुरु असताना इंजिनिअर्स कुठेच दिसत नाहीत. सगळीकडे दिसतात ते फक्त मजूर. मुख्यमंत्री सावंत यांनी परवाच रात्रीच्यावेळी पणजीतील स्मार्ट सिटी कामांची पाहाणी केली. पावसाळ्यात पणजी शहर बुडले नाही तर लोक सध्या होत असलेले त्रास तरी विसरतील. मात्र पावसाळ्यात पणजीचे आणखी दशावतार झाले तर लोक सरकारला माफ करणार नाहीत.
मे महिना जवळजवळ संपत आलाय. तीन दिवस शिल्लक आहेत. जून महिन्यात पावसाचा मारा सुरू होईल, राजधानी पणजी शहर गंभीर आजार जडल्यासारखे सुन्न पडलेय. प्रत्येक रस्ता पूर्णपणे फोडला गेलेला आहे. फुटपाथ शिल्लक नाहीत. वाहने कुठे पार्क करावी ते लोकांना कळत नाही. कारण जगाच उपलब्ध नाही. रस्त्यांवर खड्डे पडलेत असे नव्हे तर खड्डयांची चाळणच सगळीकडे असल्याने रस्ते शिल्लकच राहिलेले नाहीत, अशी स्थिती काकुलो मॉलच्या परिसरात व पुढे सुरबूस रेस्टॉरंटपर्यंतच्या मार्गावर दिसुन येते. शहर वाचवण्याबाबत पणजी महापालिका पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे.
पुढील महापालिका निवडणुकीत कदाचित पणजीचे मतदार अनेक नगरसेवकांना शिक्षा करतीलच. स्मार्ट सिटीचा निधी हा केंद्र सरकारकडून येतो. हा निधी कसा खर्च करावा, काम कसे करून घ्यावे, पणजी शहर कसे लवकर नीटनेटके करावे याचे नियोजन अगोदरच मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मिळून करायला हवे होते. मात्र अजिबातच नियोजन केलेले नाही. वाट्टेल तसे गेले वर्षभर पणजी शहर फोडून ठेवले आहे. काही ठिकाणी सिमेंटचा रस्ता केला जात आहे. तर काही ठिकाणी डांबराचा रस्ता केला जात आहे. आश्चर्य असे की शहरभर स्मार्ट सिटीचे काम सुरू असताना इंजिनिअर्स कुठेच दिसत नाहीत. सगळीकडे दिसतात ते फक्त मजूर.
मुख्यमंत्री सावंत यांनी परवाच रात्रीच्यावेळी पणजीतील स्मार्ट सिटी कामांची पाहाणी केली. त्यांनी पाहणीसाठी रात्र का निवडली ते कळले नाही. त्यांच्यासोबत स्मार्ट सिटीचे सीईओ संजीत रॉड्रिग्ज उपस्थित होते. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या सर्व नगरसेवकांना घेऊन स्मार्ट सिटी कामांची पाहणी करायला हवी होती. पणजीला कसे खड्ड्यात घातले गेले आहे ते नगरसेवक, आमदार, महापौर व मुख्यमंत्री यांनी एकत्रितपणे पाहायला हवे होते. पणजी शहर यापुढे पावसाळ्यात बुडणार हे कलून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पाहणी करण्याचा सोपस्कार पार पाडला.
मनोहर पर्रीकर जर आज हयात असते आणि ते मुख्यमंत्रिपदी असते तर त्यांनी निश्चितच सातत्याने पणजीची पाहणी केली असती. त्यांनी पणजीची अशी दुर्दशा होऊच दिली नसती. सुडा. बांधकाम खाते, महापालिका या यंत्रणांच्या सगळ्या इंजिनियर्सना पर्रीकर यांनी कामाला लावले असते. विद्यमान मुख्यमंत्री याबाबत कमी पडले. पणजीचे आमदार तथा महसूल मंत्री मोन्सेरात यांनी परवा थेट टीका केली की, स्मार्ट सिटीची कामे निकृष्ट झालेली आहेत. थेट आमदार व मंत्रीच सांगतो की कामे ठीक झालेली नाहीत. यामुळे पणजीवासियांना आणखी दरदरून घाम फुटला आहे.
पणजीत पावसाळ्यात पाणी तुंबले तर आपण जबाबदार नसेन, अभियंते कामाची देखरेख करत आहेत, ती त्यांची जबाबदारी आहे असे विधान गेल्या महिन्यात बाबूशने केले होते. काहीसे तसेच विधान बांधकाम मंत्री काब्राल यांनीही केले आणि महापौर रोहित मोन्सेरात यांनीही तसेच म्हटले होते. म्हणजे सर्व नेत्यांनी आपले हात वर केले आहेत. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी आता शेवटच्या टप्प्यात धावपळ करून किंवा एकदा पाहणी करून काय साध्य होईल? राज्याचे मुख्य सचिव तर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे चेअरमन आहेत. पण मुख्य सचिवांनी पणजीत फिरून कधी पाहणी केल्याचे कुणी पाहिलेच नाही.
पणजीतील कामे केवळ एक यंत्रणा करत नाही. बांधकाम खाते, सुडा, स्मार्ट सिटी यंत्रणा व महापालिका यांच्याकडून विविध कामे केली जात आहेत. मध्येच वीज खाते देखील कोलमडते. एकदा ठीक केलेला रस्ता पुन्हा फोडला जात आहे. आल्तिनो येथे झोपडपट्टीच्या दिशेने जो रस्ता जातो, त्या रस्त्यावरील अर्ध्या भागात चांगल्या पद्धतीचे पेवर्स रस्त्याकडेला बसविण्यात आले होते. वर सिमेंट वगैरे टाकून ते मजबूत करण्यात आले होते. हे पेवर्स ४८ तासांत पुन्हा काढले गेले.
यामुळे लोकांना धक्काच बसला. पेवर्स काढून पुन्हा तिथे वीज केबल टाकले गेले. पुन्हा सिमेंट लावले गेले. जनतेचा पैसा अशा प्रकारे खर्च केला जात आहे. राजधानी पणजीत दुकानदारांचे, छोट्या हॉटेल व्यावसायिकांचे, व्यापाऱ्यांचे आतापर्यंत खूप नुकसान झाले आहे. रस्त्याच्या बाजूचे दुकानदार हैराण आहेत. मनोज काकुलो यांच्यासारखा उद्योजक संतप्त आहे. पणजीतील अनेक व्यावसायिकांनी तोंडाला पट्टी बांधलेली आहे, पण काकुलो यांच्यासारखा उद्योजक उघडपणे बोलत तरी आहे. माजी महापौर उदय मडकईकर हे देखील सरकारी यंत्रणेला एक्सपोज करत आहेत, पणजी शहर वाचविण्यासाठी बोलावेच लागेल.
उत्पल पर्रीकर पुढील काळात पणजीचे आमदार बनू पाहतात. त्यांनी एकदा विधानसभा निवडणूक लढवून पाहिली. नागरिकांचा त्यांना पाठिंबा मिळाला, पणजी वाचविण्यासाठी उत्पन यांनाही आता सक्रिय व्हावे लागेल. शहराला वाली राहिलेला नाही. प्रत्येकाने हात वर केले आहेत. पणजीला चारही बाजूंनी फोडून टाकले गेलेय. है काम जुलै महिन्यापर्यंत पूर्णच होऊ शकणार नाही. पावसाळ्यात लोकांनी काय करायचे? वाहन चालक व विद्यार्थ्यांनी काय करायचे? आता पणजीत ट्रक रस्त्यातच रुतून पडतात.
काही वाहने रस्त्याकडेच्या खड्ड्यात पडतात. पावसाळ्यात कदाचित नागरिक वाहून गेले, विद्यार्थी वाहून गेले अशा प्रकारच्या घटना ऐकू येतील की काय अशी भीती वाटते. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आता आंदोलन करू शकत नाहीत. कारण ते सत्तेच्या गादीवर पोहोचले आहेत. परवा पणजीत एकजण बोलत होता. भाजप विरोधात असतो तेव्हाच चांगला असतो, सत्तेत पोहोचतो तेव्हा स्मार्ट सिटीचा बट्ट्याबोळ होतो. स्मार्ट सिटीसाठी यापुढेही कोट्यवधी रुपये खर्च होत राहतील. पणजी शहर वाचले, येत्या पावसाळ्यात बुडले नाही तर लोक सध्या होत असलेले त्रास तरी विसरतील. मात्र पणजीचे पावसाळ्यात आणखी दशावतार झाले तर लोक सरकारला माफ करणार नाहीत, असे या टप्प्यावर म्हणता येते.