स्मार्ट पणजी मिशन चिरायू होवो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 10:04 PM2019-09-21T22:04:52+5:302019-09-21T22:04:56+5:30

-निरज नाईक गोव्यात लोक स्वत:ला शिक्षीत म्हणून घेतात ,परंतु कधी कधी अगदी अडाण्यासारखे वागतात. मागेपुढे जास्त विचार न करताच ...

Smart Panaji Mission to last forever! | स्मार्ट पणजी मिशन चिरायू होवो!

स्मार्ट पणजी मिशन चिरायू होवो!

Next

-निरज नाईक
गोव्यात लोक स्वत:ला शिक्षीत म्हणून घेतात ,परंतु कधी कधी अगदी अडाण्यासारखे वागतात. मागेपुढे जास्त विचार न करताच कुणावरही आरोप करून मोकळे होतात. या असल्या बेजबाबदार वागण्यामुळे अनेक राजकारण्यांना नाहक मनस्ताप सोसावा लागतो.


राजधानी पणजीचे उदाहरण घ्या. पणजी स्मार्ट सिटी करण्यावरून एकसारखे आरोप आणि तक्रारी केल्या जातात. आतापर्यंत करोडो रुपयांचा निधी खचून सुद्धा शहराची स्थिती दयनीय आहे, असा आरोप केला जातो. पणजीचे रस्ते खराब, पिण्याचा पाण्याचा पुरवठा फक्त दोन तास, थोडा जास्त पाऊस पडल्यास रस्ते जलमय होतात, सांतीनेज खाडीला गटाराचे स्वरूप आले, वाहतूकीचे तीनतेरा, पार्कींगसाठी पर्याप्त जागा नाही, कॅसिनोमुळे शहराला विकृत रूप आलेय अशा अनेक तक्रारी सर्रास केल्या जातात. लोक किती अज्ञानी आणि नकारात्क असू शकतात याचे हे ज्वलंत उदाहरण.


सरकारने जी कंपनी पणजी स्मार्ट सिटी करण्यासाठी स्थापन केली आहे तिचे नाव आहे ‘इमेजीन पणजी स्मार्टसिटी डेव्हलपमेंट लि.’ या नावातच सगळे काही आले. इथे ‘इमेजीन’ या शब्दाला महत्त्व आहे. पणजी स्मार्ट सिटी आहे असे आपण फक्त इमेजीन करायचे म्हणजे ननुसती कल्पना करायची आहे. त्यांनी कुठे सांगितले की आपण खरेच पणजी स्मार्टकरणार.आपण उगाच कंपनीशी संबंधीत लोकांना दोष देतो. स्मार्ट सिटीच्या आणखीन एका पैलूकडे आपण दुर्लक्ष करतो. सरकारला पणजीवासीयांना स्मार्ट करायचे आहे. पणजीवासीय स्मार्ट होणे म्हणजेच शहर स्मार्ट होणे. लोक स्मार्ट कसे होणार? जर शहरामध्ये सगळं आलबेल असेल, चकाचक असेल, व्यवस्थित असेल तर लोकं स्मार्ट होतील का? आज सरकारच्या कृपेने आणि इमेजीन पणजी स्मार्टसिटी डेव्हलपमेंट लि. च्या सौजन्याने पणजीतील लोक एवढे स्मार्ट बनले आहेत की कुठल्याही दिव्यातून जायला त्यांना मुळीच अडचण येत नाही. मागची अनेक वर्षे सरकारने चांगले अडथळे आणि समस्या पणजीवासीयांना सर्व क्षेत्रामध्ये तयार करून दिलेल्या आहेत. यात या कामासाठी खास तयार करण्यात आलेल्या आयपीएससीडीएल या सरकारी कंपनीचा भरपूर हातभार लागलेला आहे. आज पणजीवासीय खड्डेमय रस्त्यावरून वाहने हाकण्यात तरबेज झालेले आहेत. कमीत कमी पाण्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात कसा करायचा हे पणजीतील लोकांकडून शिकावे. विजेच्या लपंडावावर सुद्धा पणजीवासीयांनी मात केली आहे. पणजी शहरात पर्याप्त पार्किंग व्यवस्था नसूनसुद्धा कोणाचे काहीच अडत नाही. अडथळ्यांवर पणजीवासी एवढ्या स्मार्टपणे तोडगा काढतो की पणजी शहराला स्मार्ट सिटीमध्ये अव्वल नंबर मिळायलाच हवा. पणजीचे रस्ते दरेक काही मीटरवर फोडलेले आहेत. आपले वाहन हाकताना खड्ड्यांना चुकवित वाहनावरील ताबा ठेवण्याची कसरत पणजीचे लोक एवढ्या शिताफीने करतात की त्यांचा शारीरिक व्यायामही होतो आणि मनोरंजनही. याहून स्मार्ट काय असू शकतं?


संपूर्ण शहराला सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्याा देखरेखीखाली आणले जातेय, यालाही काही मूढांचा आक्षेप आहे. सीसीटीव्ही कॅमरा ही सगळ्यात प्राथमिक गरज आहे हो! संपूर्ण पणजी शहरात पणजीवासीय कशा प्रकारे स्मार्टपणे जीवनजगतात हे जोपर्यंत कॅमºयात कैद होत नाही तोपर्यंत इतर जगाला कसे समजेल? म्हणूनच आपल्या इमॅजीन पणजी स्मार्टसिटी डेव्हलमेंट लि. ने संपूर्ण शहरात शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा स्तुत्य निर्णय केवळ घेतलेलाच नाही तर तो अंमलात आणण्यासाठी हरप्रयत्न चाललेत. यासाठी आपण त्यांचे कौतुक करायला हवे. सरकारने एक गोष्ट करावी, या स्मार्ट सिटीच्या निधीतून एक सॅटेलाईट टीव्ही चॅनल सुरू करून पणजीवासीयांचे या सीसीटीव्ही कॅमेºयात टिपलेल्या सगळ्या स्मार्ट गोष्टी जगापुढे आणत पणजीचे आणि पर्यायाने पणजीकरांचे नाव मोठे करावे.

Web Title: Smart Panaji Mission to last forever!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.