घाईघाईत केलेली 'स्मार्ट' कामे पणजी बुडवणार; उत्पल पर्रीकरांसह अनेकांनी व्यक्ती केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 10:41 AM2023-04-27T10:41:15+5:302023-04-27T10:41:26+5:30
पणजीत सुरू असलेल्या स्मार्टसिटी कामांमुळे पावसाळ्यात शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: पणजीत सुरू असलेल्या स्मार्टसिटी कामांमुळे पावसाळ्यात शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जी-२० परिषदेसाठी अनेक रस्त्यांचे हॉटमिक्सिंग घाईघाईत केले. मात्र स्मार्ट सिटीची कामे अजूनही अर्धवट स्थितीतच आहेत.
१८ जून मार्ग, मार्केट, कांपाल, डॉन बॉस्को शाळा परिसर, मळा हा भाग दरवर्षी पावसाळ्यात बुडतो. त्या भागात राहणाऱ्या लोकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते. यंदा स्मार्ट सिटीच्या उत्तम दर्जाच्या कामांमुळे पणजी ही स्थिती निर्माण होणार नाही असे म्हटले जात असले चित्र काही तरी भलतेच आहे.
पोर्तुगीजकालीन सहा मोठ्या गटांची दरुस्ती त्यांची स्वच्छता तसेच त्यांची कनेक्टिव्हीटीत सुधारणा केली जात आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचा विसर्ग होणे सोपे होईल व पणजीत पाणी तुंबणार नाही, असा विश्वास पणजी महानगरपालिकेने व्यक्त केला आहे. शहरातील अनेक भागांतील रस्ते फोडून काम हाती घेतले. मात्र पावसाळा जवळ आला तरी अनेक ठिकाणी कामे सुरूच आहेत. जी-२० शिखर परिषदेसाठी अर्धवट स्थितीत कामे ठेवून रस्त्यांचे हॉटमिक्सिंग केले गेले. त्यामुळे पुन्हा एकदा हे रस्ते फोडणार का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
- स्मार्ट सिटीची अजूनही अनेक भागांत कामे जैसे थेच आहेत. सांतीनेझ भागात हे चित्र हमखास दिसते. वर्ष- भरापासून ही कामे सुरु आहेत. तर दुसरीकडे पणजीतील रस्तेही खचू लागले आहेत.
- वाहने त्यात कलंडू लागली आहेत. त्यामुळे कामांच्या दर्जाबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. एकूणच यंदाही पणजी पावसाळ्यात बुडण्याची भीती व्यक्त होत आहे.
यंदा पावसात पणजी बुडेलच. शिवाय आरोग्य व सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होणार आहे. रस्ते खचून वाहने कलंडत आहेत. या कामांच्या दर्जाबाबतही शंका आहे. त्यामुळे जिल्हाधिकायांनी याची दखल घेऊन ठोस पावले उचलावीत. - उत्पल पर्रीकर, पणजी
मळा परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत जलस्रोत खात्याकडून ज्या पद्धतीने कामे सुरू आहेत, त्याबाबत आपण असमाधानी आहे. मळा परिसरात दरवर्षी पाणी तुंबून तेथील घरांमध्ये जाते. आता मळा भागात असलेल्या खाडीत सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे यंदाच्या पावसात लोकांच्या घरात पाण्याबरोबरच सांडपाणीही जाईल. - शुभम चोडणकर, नगरसेवक
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"