दुबईहून दाबोळी विमानतळावर आलेल्या विमानातील दोन प्रवाशांकडून ५० लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 09:24 PM2020-12-16T21:24:19+5:302020-12-16T21:24:42+5:30
‘डायरेक्टरेट ऑफ रेव्हीन्यु इंन्टेलीजंन्स’ च्या गोवा विभागाने केली ही कारवाई
वास्को: ‘डायरेक्टरेट ऑफ रेव्हीन्यु इंन्टेलीजंन्स’ च्या गोवा विभागाने बुधवारी (दि १६) कारवाई करत दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या दोन पुरूष प्रवाशांकडून एक कीलो तस्करीचे सोने जप्त करून त्यांना अटक केली. जप्त केलेले सोने (पेस्ट पद्धतीने होते) सुमारे ५० लाख रुपये कींमतीचे असल्याची माहीती विभागातील सूत्रांकडून प्राप्त झाली असून त्यांच्याकडून याप्रकरणात अधिक तपास चालू आहे.
याबाबत माहीती घेण्यासाठी विभागातील विश्वसनीय सूत्रांशी संपर्क केला असता बुधवारी सकाळी ही कारवाई केल्याचे सांगितले. दुबईहून दाबोळीवर येणार असलेल्या विमानातून तस्करीचे सोने आणण्यात येणार असल्याची माहीती ‘डायरेक्टरेट ऑफ रेव्हीन्यु इंन्टेलीजंन्स’ च्या अधिकाºयांना मिळताच याप्रकरणात कारवाई करण्यासाठी त्यांनी सापळा रचला. ही कारवाई करण्यासाठी त्यांनी दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांची सहायता घेतल्याची माहीती उपलब्ध झाली.
दुबईहून विमान दाबोळीवर उतरल्यानंतर प्रवाशांची तपासणी करताना दोघा प्रवाशांवर संशय निर्माण झाल्याने त्यांची कसून तपासणी करण्यास सुरवात केली. या तपासणी वेळी त्या प्रवाशांनी शरीरातील भागात हे तस्करीचे सोने (पेस्ट पद्धतीने) लपवून आणल्याचे स्पष्ट होताच त्यांना ताब्यात घेऊन हे सोने जप्त केले.
त्या प्रवाशांकडून जप्त केलेले हे सोने ५० लाख रुपयांच्या आसपास असल्याची माहीती सूत्रांनी दिली. अटक केलेले हे प्रवाशी भारतीय असल्याची माहीती सूत्रांनी देऊन त्यांनी हे तस्करीचे सोने कुठून आणले होते तसेच नंतर हे सोने कुठे नेण्यात येणार होते याबाबत ‘डायरेक्टरेट आॅफ रेव्हीन्यु इंन्टेलीजंन्स’ चे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.