...म्हणून एल्टन यांचा विषय इथेच संपवतोय; मुख्यमंत्र्यांकडून 'त्या' वादावर पडदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2024 10:35 AM2024-07-17T10:35:16+5:302024-07-17T10:35:43+5:30
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सभापतींबाबत केलेल्या विधानावरून सत्ताधारी चांगलेच बरसले.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : आम्ही सरकारमध्ये आहोत किंवा आमच्याकडे बहुमत आहे म्हणून आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी माफी मागावी, असा आमचा हेतू नव्हता. सभापतींच्या खुर्चीचा मान कायम राहावा यासाठीच आम्ही हा मुद्दा लावून धरला होता. आता केवळ अधिवेशनाचे कामकाज अडकून पडू नये यासाठी एल्टन डिकॉस्टा यांचा विषय आम्ही इथेच संपवतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल, मंगळवारी विधानसभेत केले.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सभापतींबाबत केलेल्या विधानावरून सत्ताधारी चांगलेच बरसले. एल्टन यांनी सभापतींची माफी मागावी अन्यथा हक्कभंग ठराव आणणार, अशी मागणी करत सत्ताधाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे काल, मंगळवारीही कामकाजाच्या सुरुवातीलाच हा विषय आला. त्यामुळे दुपारी १२:३० वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले होते. अखेर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, विजय सरदेसाई व मुख्यमंत्र्यांनी या विषयावर पडदा टाकून कामकाज सुरू केले.
विधानसभा अधिवेशन सुरू झाल्यानंतर सभापतींवर टीका करणे योग्य नाही. आमदारच नव्हे तर पत्रकार किंवा लोकांनी सभापतींबद्दल आक्षेपार्ह बोलू नये. आमचा हेतू एवढाच होता की, सभापतींच्या खुर्चीचा आदर सर्वांनी ठेवावा, असे मुख्यमंत्र यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सभापतींकडे हा विषय संपविण्याची मागणी केली होती. तसेच विजय सरदेसाई यांनीदेखील सभापतींचे अधिकार लक्षात आणून देत हा विषय त्वरित संपवावा, अशी मागणी केली होती. एल्टन डिकॉस्टा हे एसटी समाजाच्या हितासाठीच बोलले; परंतु सत्ताधारी पक्षाने हा विषय लावून धरणे चुकीचे आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.