शिक्षकी पेशा सांभाळताना सामाजिक चळवळींचाही वसा; श्रीमती साबिना मार्टिन्स यांचं प्रेरणादायी कार्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 01:26 PM2018-10-15T13:26:02+5:302018-10-15T13:27:40+5:30

महिलांचे प्रश्न असोत की विकासाची दिशा ठरविणारा प्रादेशिक आराखड्याचा विषय असो, चळवळ्या व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीमती मार्टिन्स यांचा नेहमीच पुढाकार असतो. 

social activist sabina martins inspirational work | शिक्षकी पेशा सांभाळताना सामाजिक चळवळींचाही वसा; श्रीमती साबिना मार्टिन्स यांचं प्रेरणादायी कार्य 

शिक्षकी पेशा सांभाळताना सामाजिक चळवळींचाही वसा; श्रीमती साबिना मार्टिन्स यांचं प्रेरणादायी कार्य 

Next

पणजी : गेली तब्बल ३१ वर्षे शिक्षकी पेशा सांभाळताना श्रीमती साबिना मार्टिन्स अनेकदा आक्रमक होऊन सरकारविरुद्धही संघर्षाची भूमिका घेत असतात. गोव्याची पेटती मशाल म्हणून त्यांना ओळखले जाते. अशा प्रकारे सामाजिक जाणीवेने झपाटून एखादीच महिला पुढे येते. गोव्यात महिलांचे प्रश्न असोत की विकासाची दिशा ठरविणारा प्रादेशिक आराखड्याचा विषय असो, चळवळ्या व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीमती मार्टिन्स यांचा नेहमीच पुढाकार असतो. 

तत्परता आणि कणखरपणा, हाती घेतलेल्या कार्यावरील निष्ठा आणि त्यासाठी लागणारी कष्टवृत्ती असे सर्व गुण श्रीमती मार्टिन्स यांच्या अंगी आहेत. ‘लोकमत’च्या या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. चळवळींमध्ये कशा काय आलात या प्रश्नावर साबिना म्हणाल्या की,‘१९८0 साली त्यावेळच्या प्रोग्रेसिव्ह स्टुडंटस युनियन (पीएसयु) या विद्यार्थी संघटनेतून विविध प्रश्नांवरील आंदोलनात हिरीरीने भाग घेतला. कॅपिटेशन फी, विद्यार्थ्यांना बसगाड्यांवर अर्ध्या तिकिटाची मागणी, विद्यापीठ फीवाढ या प्रश्नावर त्यावेळी रस्त्यावर उतरलो. गोव्याच्या वेगवेगळ्या भागात पथनाट्यांमध्येही सहभाग घेतला त्यानंतर संघर्ष नाट्य मंच तसेच सिटिझन्स फॉर सिव्हिल लिबर्टिज अ‍ॅण्ड डेमोक्रेटिक राइटस या संघटनेतही काम केले. 

‘बायलांचो साद’ ही संघटना कधी स्थापन केली, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, महिलांवरील अत्याचाराविरुध्द लढा देण्यासाठी १९८६ साली या संघटनेची स्थापना केली. गेल्या १२ आॅक्टोबर रोजी या संघटनेला ३२  वर्षे पूर्ण होत आहेत. गोव्याच्या विकासाची दिशा ठरविणाºया २0२१ च्या प्रादेशिक आराखडा आंदोलनातही त्यांचा मोठा सहभाग आहे. या एकमेव कारणासाठी स्थापन झालेल्या गोवा बचाव अभियानच्या त्या निमंत्रक आहेत. 

शिक्षण क्षेत्रातील योगदानाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की,‘१९८७ साली शिक्षकीपेशा सुरु केला. हायरसेकंडरी आणि सेकंडरी स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले. रसायनशास्राच्या शिक्षिका म्हणून सध्या कार्यरत असून पीएचडीही घेतली आहे. १९९६ साली शारदा मंदिर हायस्कूलमध्ये रुजू झाले. म्हापशातील सेंट झेवियर्स हायरसेकंडरीत दोन वर्षे विद्यादान, वास्कोतही सेंट जोझेफ विद्यालयात शिकविले. 

नोकरी, व्यवसाय सांभाळून तुम्ही चळवळींना कसा काय वेळ देऊ शकता असे त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ‘दुपारपर्यंत आपण शाळेत असते त्यामुळे अगदी तातडीचे आणि महत्त्वाचे काही असले तरच आपण त्या कामासाठी बाहरे पडते पण सहसा शाळेकडे दुर्लक्ष करीत नाही. मुलांना शिकविण्याच्या बाबतीत कोणताही परिणाम होणार नाही याबाबत नेहमीच कटाक्ष असतो. अनेकदा खास करुन महिलांवरील अत्याचारांबाबत तातडीने दखल घ्यावी लागते अशावेळी गत्यंतर नसते.’

गोवा बचाव अभियानतर्फे प्रादेशिक आराखड्याच्या विषय त्यांनी उचलून धरला. राज्याच्या विकासाची दिशा ठरविणारा हा आराखडा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊनच अंमलात आणावा, अशी त्यांची मागणी आहे. विकासकामे व्हावीत, पण पर्यावरण सांभाळूनच असे त्यांचे म्हणणे आहे.

‘बायलांचो साद’ या संघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे या संघटनेला अध्यक्ष नाही किंवा सचिवही नाही. सरकारचे कोणतेही आर्थिक पाठबळ नाही. कार्यकर्त्यांच्या देणग्यांवरच ही संघटना चालते तसेच या संघटनेची नोंदणीसुध्दा नाही. महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत साबिना या फारच संवेदनशील आहेत. 
 

Web Title: social activist sabina martins inspirational work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.