राज्य सहकारी बँकेत सॉफ्टवेअर घोटाळा: सरदेसाई
By admin | Published: July 28, 2016 05:50 PM2016-07-28T17:50:37+5:302016-07-28T17:50:37+5:30
गोव्याची शिखर बँक असलेल्या गोवा राज्य सहकारी बँकेत १५.५९ कोटींचा डेटा सॉफ्टवेअर कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केला.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २८ : गोव्याची शिखर बँक असलेल्या गोवा राज्य सहकारी बँकेत १५.५९ कोटींचा डेटा सॉफ्टवेअर कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केला. मेसर्स इन्फो डायनेमिक सॉफ्टवेअर सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अगोदर कार्यान्वित करण्यात अलेल्या सॉफ्टवेअरमध्ये दोष असल्याचे आढळून आल्यानंतरही पुन्हा त्याच कंपनीला सॉफ्टवेअरचे कंत्राट देण्यात आले आणि ते बेकायदेशीरपणे देण्यात आल्याचा त्यांचा आरोप होता.
गोवा राज्य सहकारी बँकेच्या पणजी येथील मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या डेटा सेंटर प्रकरणात घोटाळा असल्याचा दावा आमदार सरदेसाई आणि इतरांनी केला. ज्या डायनेमिक सॉफ्टवेर सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून या बँकेला सॉफ्टवेअर देण्यात आले होते त्या कंपनीलाच पुन्हा दुसरे कंत्राट देण्यात आले आहे.
कंत्राट देताना कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली नाही. निविदांसाठी जाहीरात देण्यात आली नाही. केवळ वेबसाईटवर टाकून नंतर चार खाजगी कंपन्यांना बँकेकडून प्रकल्पासाठी प्रस्तावाची पत्रे पाठविण्यात आली. त्यात सॉफ्टेक कॉम्प्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, इन्फो डायनेमिक सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड, नुपूर टेक्नोलोजीस प्रायव्हेट लिमिटेड, वृंदा एन्टरप्रायझीस आणि स्मार्ट इम्फॉर्मेशन सिस्टम या कंपन्याचा समावेश होता.
ठराविक कंपन्यांना प्रस्ताव पाठविण्याच्या कृतीला दिगंबर कामत यांनी आक्षेप घेतला. तसे प्रस्ताव कायद्याने केवळ बँकेशी संलग्न असलेल्याच कंपन्यांना बँक पाठवू शकते. त्या कंपन्या बँकेशी संलग्न नसल्यामुळे बँकेने या कंत्राटासाठी जाहीरात करायला हवी होती. यामुळेच एकंदरीत कारभार हा संशयास्पद वाटत असल्याचे ते म्हणाले.
ज्या कंपन्यांकडून कॉटेशन्स आल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे त्या पैकी एक असलेली सॉफ्टटेक या कंपनीने आपण कोटेशन पाठविलेच नसल्याचे पत्र दिल्याची माहिती सरदासाई यांनी दिली. ते पत्र त्यांनी सभागृहाला सादर केले. या प्रकरणात न्यायालयीन चौकशीची मागणी त्यांनी केली. परंत या प्रकरणात तूर्त खात्याकडून चौकशी केली जाईल अणि त्यात तथ्य आढळून आल्यास नंतर नाबार्डाकडून तपास केला जाईल असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले