आधी वारकऱ्यांच्या समस्या सोडवा, मगच निवास बांधा; आमदार विजय सरदेसाई यांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2024 08:22 AM2024-07-24T08:22:49+5:302024-07-24T08:28:34+5:30
अधिवेशनाच्या शून्य तासाच्या कामकाज दरम्यान आमदार विजय सरदेसाई यांनी हा विषय मांडला.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सुमारे २१ मंडळे ४५० किलोमिटर पेक्षा जास्त अंतर पायी चालत पंढरपूर वारी करत असतात. वारी दरम्यान त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या वारकऱ्यांना सरकारने समाजकल्याण खात्यातर्फे थोडेफार अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली. केवळ पंढरपूर येथे पोहचून भक्त निवास बांधणार, हे जाहीर केले म्हणजे वारकऱ्यांच्या समस्या सोडवल्या असे होत नाही, अशी टोला देखील सरदेसाई यांनी लगावला.
अधिवेशनाच्या शून्य तासाच्या कामकाज दरम्यान आमदार विजय सरदेसाई यांनी हा विषय मांडला. वारकऱ्यांना वारी दरम्यान कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याची कल्पना देखील दिली. वारकरी मोठ्या श्रध्देने पायी चालत पंढरपूरला जातात. त्यांना प्रवासात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खासकरून बेळगाव ते कोल्हापूर या दरम्यान त्यांना वाटेत नीट सुविधा मिळत नाही. येथे शौचालये नाही किंवा आंघोळ करण्यासाठी, कपडे बदलण्यासाठी योग्य सुविधा नाहीत. त्यामुळे सरकारने यात लक्ष्य घालून वारकऱ्यांना तशा प्रकारच्या सुविधा दिल्या जाऊ शकतात का, हे पाहावे. या सुविधा मिळाल्या नाहीत तर वारकरी आजारी पडण्याच्या भीती असते, असे सरदेसाई यांनी सांगितले.
सरकारने वारकऱ्यांना सुरक्षित घरी आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था करावी. हज यात्रेसाठी समाज कल्याण खात्यातर्फे अनुदान दिले जाते, त्याच धर्तीवर वारकऱ्यांना देखील अनुदान देण्याची गरज आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. यावर समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आवश्यक गोष्टी करू, असे सांगितले.