सरकारमधील काही मंत्री अहंकारी, असंवेदनशील; वेळ आल्यानंतर सर्वकाही सांगेन: रमेश तवडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2024 01:20 PM2024-11-20T13:20:40+5:302024-11-20T13:21:46+5:30
सरकारमधील इतर मंत्रीही संवेदनशील हवेत. मला अनेक वाईट अनुभव आहेत, ते मी वेळ आल्यानंतर सांगेन.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सभापती रमेश तवडकर यांची सरकार विरोधातील विधाने करणे सुरूच ठेवले आहे. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे तवडकर यांची समजूत काढण्यासाठी काल भेट घेणार होते, परंतु ही भेट होऊ शकली नाही. काही मंत्री अहंकारी वृत्तीचे आहेत, असा आणखी एक तक्रारीचा सूर तवडकर यांनी एका चॅनलशी बोलताना लावला. तवडकर म्हणाले की, ज्या पद्धतीने काही कामे पुढे जायला हवीत, ती जात नाहीत. आदिवासींना त्यांचे जमिनींचे हक्क बहाल करण्याचा विषय असो, किंवा अन्य विषय. केवळ मुख्यमंत्र्यांनीच संवेदनशील असून भागणार नाही. सरकारमधील इतर मंत्रीही संवेदनशील हवेत. मला अनेक वाईट अनुभव आहेत, ते मी वेळ आल्यानंतर सांगेन.
मला मंत्री बनण्याची इच्छा नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मी गोविंद गावडे यांना बोलावून, समोर बसवून स्पष्ट शब्दांत तसे सांगितले होते. 'तुमचे कोणाबरोबरही फाटले असेल, तर तुम्ही ठिगळ लावा', असेही त्यांना मी म्हणालो होतो. त्यानंतर त्यांनी हे जाऊन मुख्यमंत्र्यांना सांगितले. गावडे यांनी माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप सुरूच ठेवला.
मी रॅलीमध्ये व्यग्र
दरम्यान, तानावडे यांच्या नियोजित भेटीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, 'सध्या मी माझ्या भगवान बिरसा मुंडा रॅलीमध्ये व्यग्न आहे. उद्या दि. २० रोजी काणकोण येथे रॅलीची सांगता झाल्यानंतरच मी मोकळा होईन. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांना माझ्याशी बोलायचे असेल, तर २१ रोजी किंवा त्यानंतरच मला सवड मिळेल.' तवडकर यांची ही रॅली २५ रोजी पत्रादेवी पेडणे येथून सुरू झाली आहे.