काही पक्ष एनजीओ झालेत; सुदिन ढवळीकर यांचा आरजीला नाव न घेता जोरदार टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2024 09:00 AM2024-06-01T09:00:30+5:302024-06-01T09:02:22+5:30
दोन दिवसांपूर्वीच आरजीच्या नेत्यांनी ढवळीकर यांच्यावर टीका केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : 'राजकीय पक्ष म्हटला की वेगळे आयाम लागतात. राजकीय पक्षांना काही नियम असतात. मात्र राज्यात सध्या जे नवीन पक्ष निर्माण झाले आहेत, ते अजूनही एका एनजीओसारखे काम करू लागले आहेत. त्यामुळे ते स्वतःबरोबर आपल्या नेत्यांचेसुद्धा हसे करू लागले आहेत' अशी टीका वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली. शुक्रवारी फोंडा येथे पत्रकार परिषदेत ढवळीकर यांनी कोणत्याच पक्षाचे नाव न घेता जोरदार टीका केली. त्यांचा रोख रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाकडे होता असे दिसले. दोन दिवसांपूर्वीच आरजीच्या नेत्यांनी ढवळीकर यांच्यावर टीका केली होती.
मंत्री ढवळीकर म्हणाले, 'दुर्भाट येथे हायव्होल्टेजमुळे जो काही प्रकार झाला, तो खरेतर तांत्रिक होता. 'हायव्होल्टेजमुळे काही लोकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त झाली आहेत. या घटनेला वेगळीच माणसे जबाबदार आहेत. ही घटना होण्यासाठी काही माणसेसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. वीज खाते आपल्या परीने चांगले काम करत आहे. आमच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती मिळताच जावून पाहणी केली. वस्तूस्थिती खात्यासमोर मांडलेली आहे.
स्थानिक सरपंच चंदन नाईक, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, पंच सदस्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली आहे. लोकांचे किती नक्की नुकसान झाले आहे, याचा आढावासुद्धा घेतलेला आहे. वीज खात्याकडून जे काही करता येईल ते नक्की करू. माधवराव ढवळीकर ट्रस्टचे मिथिल ढवळीकर हेसुद्धा या नागरिकांशी संपर्क साधून आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही लोकांना मदत केली आहे, असे ढवळीकर म्हणाले.