पर्यावरणाच्या संतुलनासाठी गोव्यात अत्यग्निष्टोम सोमयाग
By admin | Published: February 11, 2017 07:28 PM2017-02-11T19:28:33+5:302017-02-11T19:28:33+5:30
संपूर्ण मानवजातीच्या, जीवसृष्टीच्या कल्याणासाठी तसेच पर्यावरणाचे संतुलन व्यवस्थित राहावे यासाठी गोव्यातील म्हापसा येथील देव बोडगेश्वर मंदिरासमोर अत्यग्निष्टोम सोमयागाचे आयोजन करण्यात आले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
म्हापसा, दि. 11 : संपूर्ण मानवजातीच्या, जीवसृष्टीच्या कल्याणासाठी तसेच पर्यावरणाचे संतुलन व्यवस्थित राहावे, मानव जातीचे कल्याण व्हावे या हेतूने उत्तर गोव्यातील म्हापसा येथील देव बोडगेश्वर मंदिरासमोर अत्यग्निष्टोम सोमयागाचे आयोजन करण्यात आले आहे.
८ मार्च ते १३ असा सहा दिवस हा सोमयाग होणार असून सहाव्या दिवशी त्याचा समारोप होणार आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सहभागी होण्यास मिळणा-या या सोमयागाचे २२ वर्षांनंतर गोव्यात आयोजन करण्याचा योग आला असल्याची माहिती बल्लाळ आपटे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
भारतातील इतर राज्यांत अशा प्रकारच्या यागाचे आयोजन नित्यनेमाने होत असले तरी गोव्यात त्याचे आयोजन होत नसल्याचे आपटे यावेळी म्हणाले. त्याचे आयोजन करणे बरेच कठीण काम असल्याने आयोजन होत नसल्याची माहिती त्यांनी दिली. या यागासाठी सर्व वेदात पारंगत असलेल्या १७ ब्राह्मणांची आवश्यकता असून त्यांना सहकार्य करण्यासाठी १० मदतनीस वापरण्यात येणार आहेत.
सकाळी ८ वाजता सुरू होणारा याग संध्याकाळी ९ वाजेपर्यंत चालू राहणार आहे. सोमवल्ली नावाची वनस्पती यागासाठी वापरण्यात येणार असून हीच वनस्पती यागात वाहिली जाणार आहे. अमेरिकेतील नासा संशोधन केंद्राच्या वतीने अग्निपासून पर्यावरणाला होणारे फायदे मोठ्या प्रमाणात संशोधनही सुरू असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.
दिवसेंदिवस पर्यावरणाची प्रचंड प्रमाणावर हानी होत चालली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या प्रभावामुळे दिल्लीतील तसेच हरियाणा राज्यातील हायस्कूल्स काही काळ बंद ठेवावी लागली होती. होणारी ही हानी बिघडलेली ऋतूचक्र व्यवस्थित चालावे व सर्वसामान्य लोकांचे कल्याण व्हावे हा या मागचा मुळ उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व जाती धर्माच्या लोकांचे कल्याण व्हावे या उद्देशाने यागाचे आयोजन होत असल्याने याग सर्वांसाठी खुला राहणार आहे. मुंबईतील सन्यास आश्रमचे विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज हे या यागाचे खास वैशिष्ठ असणार आहे.