सोनाली फोगाटचा कारस्थान रचून खून; स्वीय सचीव सुधीर सांगवान व साथीदारास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 08:50 PM2022-08-25T20:50:15+5:302022-08-25T20:50:57+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली फोगाट यांच्या मृतदेहावर जखमा आढळल्या आहेत.
वासूदेव पागी
पणजी : भाजप नेत्या व अभिनेत्री सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणी अखेर हणजूण पोलिसांनी आज सोनालीचा पीए सुधीर सांगवान व त्याचा साथीदार सुखविंदर सिंग यांच्यासह आणखी दोघांविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. पीए सांगवान यानेच खुनाचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मृतदेहाची उत्तरीय इन कॅमेरा करण्यात आली आहे.
सोनालीचा खूनच झाला असल्याचा दावा करणाऱ्या फोगाट कुटुंबियांना या वाईट प्रसंगात दिलासा देणारा निर्णय हणजूण पोलिसांनी घेतला आहे. या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम ३०२, (३४ )अंतर्गत खुनाचा आणि कारस्थान रचून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती म्हापशाचे पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिली. मृतदेहावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात गुरूवारी उत्तरीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवाल गोमेकॉकडून बनविण्यात आला आहे, परंतु सोनालीच्या मृत्यूचे कारण राखून ठेवण्यात आले आहे. मात्र सोनालीच्या मृतदेहावर जखमा आढळून आल्या आहेत.
दरम्यान, आधी खुनाची तक्रार दाखल करा व नंतरच शवचिकित्सा करा, या भुमिकेवर ठाम राहिलेले सोनालीच्या कुटुंबियांनी गुरूवारी सामंजस्य दाखविताना शवचिकित्सेला परवानगी दिली. परंतु या चिकित्सेचे पूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग झाले पाहिजे या अटीवर त्यांनी संमती दिलेली. संशयास्पद प्रकरणात गोमेकॉत शवचिकित्सा ही कॅमराबद्धच होत असल्यामुळे फोगोट कुटुंबियांची अट मान्य करणे हे पोलीस व गोमेकॉसाठी नवीन गोष्ट नव्हती. शवचिकित्सेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे.
आणखी चाचण्या
सोनालीच्या व्हिसेराची चाचणी करण्याची सूचना गोमेकॉच्या फॉरेन्सिक विभागाकडून करण्यात आली आहे.तसेच हिस्टोपेथोलॉजिकल आणि सेरोलॉजिकल चाचणी करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
पोलीस मुख्यालयातून सूचना
पोस्टमार्टम अहवालात जरी खूनाचे कारण स्पष्ट केले नसले तरी हे प्रकरण खून म्हणूनच नोंदविण्याचा निर्णय हा पोलीस मुख्यालयातून सूचना मिळाल्यानंतर घेण्यात आला. पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी या प्रकरणात सखोल चौकशी केली जाईल, असे म्हटले आहे.
रिंकूच्या तक्रारीवरून एफआयआर
सोनाली फोगाट यांच्या मृत्यूचे गूढ उकलले नसल्यामुळे निर्माण झालेला संशयकल्लोळ अजून कायम आहे. सोनाली हिला हृदयविकाराचा झटका नव्हे तर तिचा खून केल्याचा तिच्या कुटुंबियांचा दावा कायम आहे. सोनाली हिचा स्वीय सचिव सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्यावर कुटुंबीयांनी ठपका ठेवला आहे. त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीतही त्यांनीच खून केल्याचा आरोप केला आहे. सोनालीवर विषप्रयोग करून तिला ठार करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. आता हणजुण पोलिसांनी दाखल केलेला खुनाचा हल्लाही पोस्टमार्टम अहवालाच्या आधारावर नव्हे तर सोनालीचा भाऊ रिंकू ढाका याने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर केला आहे. स्वीय सचिव सुधीर सांगवान व साथीदारास अटक
सोनालीच्या शरीरावर आढळून आल्या जखमा