मच्छीमारांनी ओळखल्याने सोनियाजींची गुप्त भेट उघड !

By Admin | Published: November 15, 2016 10:15 PM2016-11-15T22:15:30+5:302016-11-15T22:15:30+5:30

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कन्या प्रियांका खासगी सहलीसाठी गेला आठवडाभर गोव्यात मुक्कामाला होत्या

Sonia Gandhi's secret meeting was exposed by the fishermen! | मच्छीमारांनी ओळखल्याने सोनियाजींची गुप्त भेट उघड !

मच्छीमारांनी ओळखल्याने सोनियाजींची गुप्त भेट उघड !

googlenewsNext

सुशांत कुंकळयेकर/ऑनलाइन लोकमत

मडगाव, दि. 15 - काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कन्या प्रियांका खासगी सहलीसाठी गेला आठवडाभर गोव्यात मुक्कामाला होत्या याची इतरांना तर सोडा पण पोलिसांना आणि स्थानिक काँग्रेस नेत्यांनाही कल्पना नव्हती. मात्र गेल्या शुक्रवारी सोनिया व प्रियांका दक्षिण गोव्यातील मोबोर बिचवर फिरायला गेल्या असता त्यांना तेथे मासेमारी करण्यासाठी आलेल्या दोन युवकांनी ओळखले आणि अत्यंत गुप्तरित्या आयोजित केलेल्या या खासगी सहलीची बातमी बाहेर फुटली.
ही भेट एवढी गुप्त होती की कुणालाही सोनिया व प्रियांकाचे फोटोही काढता आले नाहीत. त्यांना कुणी भेटू नये यासाठी हॉटेल लीलातही खास खबरदारी घेतली गेली.आपले खासगी सुरक्षा रक्षक घेऊन या दोघी मायलेकी गोव्यात आल्या होत्या.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, शुक्रवारी सकाळी सोनिया व प्रियांका आपल्या सुरक्षारक्षकांसह मोबोर किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. त्या दोघींबरोबर सुरक्षारक्षक असल्याने त्याचवेळी तेथे मासेमारी करण्यासाठी आलेल्या बेतूल येथील दोन केरकर बंधूंना त्या दिसल्या. त्यापैकी एकाने सोनियाजींना ओळखले व त्यानेच स्वत: पुढे येऊन, ‘आप सोनियाजी है ना?’ असा प्रश्न त्यांना केला. यावेळी त्यांची व केरकर यांची जुजबी बोलणीही झाली. बोलता बोलता केरकर यांनी गोव्यात काँग्रेसचा कुठला आमदार जिंकून येईल हे आम्हाला ठाऊक नाही. मात्र केपेचे आमदार बाबू कवळेकर हे निश्चित निवडून येतील असे सोनियाजींना सांगितले. यावेळी केरकर यांनी ‘तामसो’ हा मासा गरवून काढला होता. हा मासाही त्यांनी सोनियाजींना दिला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच रात्री केरकरच्या व्हॉटसअ‍ॅपवर त्याने सोनियाजींना भेट दिलेल्या माशाचे कसले पदार्थ केले आहेत त्याचा फोटो झळकला. केरकर याच्यासाठी तो आश्चर्याचा धक्काच होता.
--------------
आमदारास आश्चर्याचा धक्का
शनिवारी सोनिया गांधी यांनी फातर्पा येथील देवळाला भेट देण्याचे ठरविले होते. त्यापूर्वी त्यांनी केपेचे आमदार बाबू कवळेकर यांना फोन केला आणि फोनवर त्यांचे अभिनंदनही केले. केरकर यांच्याकडे झालेल्या बातचितीची त्यांनी कवळेकर यांना माहितीही दिली. यासंबंधी कवळेकर यांना विचारले असता, सोनियाजींचा फोन मला चकीत करणारा होता, मी या फोनची अपेक्षाही केली नव्हती. त्या माझ्याकडे आस्थेने बोलल्या असे ते म्हणाले. त्याच दिवशी त्यांनी प्रियांकासह कुंकळकरिणीचे दर्शन घेतले. मात्र त्यांची हीही भेट अगदी गुप्तपणे ठरविण्यात आली होती.
---------------------
खासगी टॅक्सीने म्युझियममध्ये
असाच धक्का त्यांनी गोवा चित्राचे क्युरेटर व्हिक्टर ह्यूगो गोमीस यांना दिला. सोमवारी सकाळी लिलातून गोमीस यांना त्यांचे म्युझियम पहाण्यासाठी दोन गेस्ट येणार असा संदेश देण्यात आला होता. या पाहुण्यांसाठी म्युझियमची तिकिटेही काढण्यात आली होती. या गेस्ट म्हणजे साक्षात सोनिया व प्रियांका असणार याची किंचितही कल्पना गोमीस यांना नव्हती. सकाळच्यावेळी टॅक्सीने त्या या म्युझियमकडे आल्या. त्यांनी सुमारे पाऊणतास फिरुन या म्युझियममधील वस्तू पाहिल्या. त्या गोमीस यांच्याकडे बोलल्याही.
वास्तविक असे व्हीव्हीआयपी येतात त्यावेळी त्यांच्याबरोबर सुरक्षा रक्षकांचा ताफा असतो. मात्र सोनियाजीं बरोबर केवळ त्यांचे खासगी सुरक्षा रक्षक होते असे गोमीस यांनी सांगितले. त्यामुळे मला ही भेट आगळीच वाटली असे ते म्हणाले. सोनिया गांधी यांच्या भेटीबद्दल अखिल भारतीय काँग्रेस समितीचे चिटणीस गिरीश चोडणकर यांना विचारले असता, सोनियाजी गोव्यात होत्या हे आम्हाला वृत्तपत्रावरील बातमीवरुन कळले. त्यांच्या या भेटीविषयी गोव्यात कुणालाच माहिती नव्हती असे ते म्हणाले.

Web Title: Sonia Gandhi's secret meeting was exposed by the fishermen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.