दक्षिणचा गुंता दोन दिवसांत सुटणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2024 09:00 AM2024-03-03T09:00:35+5:302024-03-03T09:01:42+5:30
दक्षिण गोव्यातून भाजपचे उमेदवार म्हणून चार नावे चर्चेत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : भाजपने दक्षिण गोव्यातील जागा जिंकणे ही प्रतिष्ठेची बाब बनविली आहे. या वेळेला उमेदवारी देण्याबाबत घेण्यात येत असलेल्या सावधगिरीमुळे हे स्पष्ट होत आहे. दक्षिण गोव्यात उमेदवार म्हणून अॅड. नरेंद्र सावईकर की माजी मंत्री बाबू कवळेकर यांना उमेदवारी दिली जाणार याबाबत चर्चा सुरू असून, येत्या दोन दिवसांत हा गुंता सुटणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
दक्षिण गोव्यातून भाजपचे उमेदवार म्हणून चार नावे चर्चेत होती. त्यात नरेंद्र सावईकर, बाबू कवळेकर दिगंबर कामत आणि सभापती रमेश तवडकर यांचे नाव होते. मात्र, कामत व तवडकर यांनी लोकसभा लढविण्यास उत्सुक नसल्याचे सांगितल्यामुळे कवळेकर व सावईकर यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. दोघांनाही हायकमांडने दिल्लीत बोलावून घेतले होते.
मात्र, शुक्रवारी उशिरापर्यंत काहीच निर्णय झाला नव्हता, शनिवारी सकाळी भाजप मुख्यालयात संकल्प पत्र रथयात्रेच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांना दक्षिण गोव्यातील भाजप उमेदवाराविषयी विचारले असता यावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच दोन दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असेही ते म्हणाले. उमेदवार कुणीही असले तरी दोन्ही मतदारसंघात भाजपच जिंकणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.