दक्षिण गोव्याला ड्रग्सचा विळखा, मागच्या वर्षी एकूण 77 प्रकरणं नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 07:37 PM2019-02-15T19:37:12+5:302019-02-15T19:37:23+5:30
गोवा राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्याला आता ड्रग्सचा विळखा बसू लागला आहे.
मडगाव: गोवा राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्याला आता ड्रग्सचा विळखा बसू लागला आहे. मागच्या वर्षी या जिल्ह्यात अमली पदार्थाच्या एकूण 77 प्रकरणे घडली असून, या सर्व प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे. 2017 साली याच जिल्ह्यात अमली पदार्थाच्या एकूण 60 प्रकरणे नोंदविण्यात आली होती.
मागच्या वर्षी अमली पदार्थाच्या सर्वात जास्त प्रकरणे मडगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या पोलीस ठाण्यात एकूण 17 प्रकरणे नोंदविण्यात आली असून, एकूण 22 जणांना अटक केली होती. त्यानंतर फोंडा पोलीस ठाण्याचा क्रमांक लागत असून, तेथे मागच्या वर्षी 16 प्रकरणांची नोंद आहे. वास्को पोलीस ठाण्यात 12 तर कोलवा व काणकोण पोलीस ठाण्यात प्रत्येकी हा प्रकरणे नोंद असून, वेर्णा 4, कुंकळळी, फातोर्डा व कुडचडे प्रत्येकी तीन तर मायणा - कुडतरी व कुळे पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन प्रकरणे घडली आहे. केपे, सांगे व मुरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एका प्रकरणांचा समावेश आहे.
आकडेवारीनुसार मडगाव, फोंडा, वास्को, कोलवा व काणकोण येथे ड्रग्स प्रकरणात वाढ झाली आहे अशी माहिती मिळत आहे. या ड्रग्स व्यवहारत बहुतांश परराज्यातील लोक गुंतले असल्याचेही पोलीस तपासात आढळून आले आहे. मध्यप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आदी राज्यातील लोकांचा यात समावेश आहे. 2012 साली या जिल्ह्यात अमली पदार्थाच्या एकूण 12 घटना घडल्या होत्या. तर 2013 साली हा आकडा चार इतका होता. 2014 साली एकूण सहा प्रकरणे घडली होती. तर 2015 साली हा आकडा 8 इतका होता तर 2016 साली 13 प्रकरणे या जिल्ह्यातील पोलिसांनी नोंदविली होती. अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदयाखाली पोलीस कारवाई करतात. लोकांमध्ये विशेषता युवा वर्गामध्ये जागृती केली जात आहे.