दक्षिणेत आजवर एकही महिला खासदार नाही; यंदा इतिहास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2024 09:17 AM2024-03-06T09:17:36+5:302024-03-06T09:19:30+5:30

लोकसभा निवडणूक; दरवेळी नशीब आजमावतात काही महिला उमेदवार

south goa has not yet had a single woman mp but history is possible in this lok sabha election 2024 | दक्षिणेत आजवर एकही महिला खासदार नाही; यंदा इतिहास शक्य

दक्षिणेत आजवर एकही महिला खासदार नाही; यंदा इतिहास शक्य

महेश पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपने महिला उमेदवार देण्याचा निर्णय घेऊन तशी तयारी सुरू केली असल्याने सर्वाच्या नजरा मतदारसंघाकडे लागल्या आहेत. मात्र, या मतदारसंघातून महिला उमेदवारांनी निवडणूक लढवणे ही फारशी नवी गोष्ट नाही. मात्र, प्रमुख राजकीय पक्षांकडून पहिल्यांदाच उमेदवार देण्याची चर्चा सुरू आहे.

दक्षिण मतदारसंघातील गेल्या काही वर्षांतील निवडणुकांवर दृष्टिक्षेप टाकला तरी दरवेळी किमान एक महिला उमेदवार रिंगणात उतरल्याचे दिसते. अलीकडच्या काळात, गेल्या तीन निवडणुकांमध्ये स्मिता प्रवीण साळुंके अपक्ष, आम आदमी पक्षाच्या उमेदवार स्मिता केरकर आणि शिवसेनेकडून राखी नाईक यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.

गेल्यावेळी, २०१९ च्या निवडणुकीत मतदारसंघात ७ उमेदवार रिंगणात होते. मतदारसंघात ७३.२८ टक्के मतदान झाले असले तरी यापैकी काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन हे २ लाख १ हजार ५६१ मते (४७.४६ टक्के) घेऊन विजयी झाले. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी, भाजपचे उमेदवार नरेंद्र सावईकर १ लाख ९१ हजार ८०६ मते (४५.१६ टक्के) मिळवून विजयी झाले. शिवसेनेच्या राखी नाईक यांना १७६३ मते मिळाली होती.

२०१४ च्या निवडणुकीत तब्बल १३ उमेदवारांनी दक्षिण गोवा मतदारसंघातून निवडणूक लढविली. यावेळच्या मोदी लाटेत भाजपचे नरेंद्र सावईकर १ लाख ९८ हजार ७७६ मते मिळवून विजयी झाले होते. आम आदमी पक्षाच्या उमेदवार स्वाती केरकर यांना ११ हजार २४६ मते (२.०६ टक्के) मते मिळाली होती. त्याआधी २००९ च्या निवडणुकीतही मतदारसंघातून स्मिता प्रवीण साळुंखे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली, काँग्रेसचे उमेदवार असलेल्या फ्रान्सिस सार्दिन यांनी १ लाख २७ हजार ४९४ मते (२३.८८ टक्के) मिळवत या मतदारसंघातून विजय मिळविला होता. अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या स्मिता सांळुखे यांना १७७१ मते (०.३३ टक्के) मिळाली होती.

महिला नेहमीच रिंगणात २००४ च्या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्त्या आवदा व्हिएगस 'युगोडेपा'च्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होत्या, त्यांनी ५८८१ मते मिळविली होती. १९९९च्या निवडणुकीत एकही महिला उमेदवाराने निवडणूक लढविली नाही. मात्र, १९९८ च्या निवडणुकीत अनुपमा दामोदर नाईक ऊर्फ पुष्पा भिकू मांद्रेकर यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरून ५४० मते मिळविली होती.

खासदार फक्त 'उत्तर'मधून

राज्यात १९६२ पासून झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून संयोगीता राणे सरदेसाई मगोच्या एकमेव उमेदवार खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. १९८०च्या निवडणुकीत त्यांनी हा विजय मिळविला होता. दक्षिण गोव्यातून मात्र एकही महिला कधीच खासदार म्हणून निवडून आलेली नाही.

 

Web Title: south goa has not yet had a single woman mp but history is possible in this lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.