दक्षिण भारतातील राज्यांनी हिंदी शिकावी: मुख्यमंत्री सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2024 01:10 PM2024-09-21T13:10:32+5:302024-09-21T13:11:21+5:30
हिंदी भाषिकांचा सन्मान
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : दक्षिण भारतातील राज्यांनी हिंदी शिकली पाहिजे आणि ती राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली पाहिजे. केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करूनही दक्षिण भारतातील काही प्रादेशिक राजकीय पक्ष अजूनही हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.
राज्योतिक राष्ट्रभाषा विद्यापीठाने कार्य करणाऱ्या हिंदी भाषिक मान्यवरांच्या सन्मान समारोह कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रवींद्र भवन येथे आयोजित या समारंभात मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, की स्वातंत्र्यानंतर १४ वर्षांनी गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला. त्यावेळी अनेकजण मराठी भाषेत शिकत होते आणि राज्यात हिंदी भाषा फारशी प्रबळ नव्हती. पण जसजसा वेळ निघून गेला तसतसे शेजारील राज्यातून बरेच लोक गोव्यात स्थायिक झाले आणि त्यानंतर राज्यात हिंदी आणि कन्नड भाषेचा प्रभाव वाढला.
राष्ट्रभाषेतून संवादात होते मदत
मला वाटते की, या सर्व दक्षिण भारतीय राज्यांनी हिंदी भाषा शिकली पाहिजे, कारण ती काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत संपर्काची मुख्य भाषा आहे. प्रादेशिक भाषाही वापरायला हव्यात यात शंका नाही पण हिंदी भाषा शिकल्याने कामात आणि संवादात मदत होईल. हिंदी भाषेतून आपण एकमेकांशी जोडले जाणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आमदार दिगंबर कामत, कोकण रेल्वेचे अधिकारी संतोष कुमार झा आदींनीही हिंदी भाषेबाबत मत व्यक्त केले. गोव्यात हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सहा जणांचा यावेळी सत्कार करण्यात आला.