बोलताना काळजी घ्या, मनोहर पर्रीकर यांना निवडणूक आयोगाची समज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 08:21 PM2017-02-16T20:21:33+5:302017-02-16T20:21:33+5:30
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भविष्यात, बोलताना अधिक काळजी घ्यावी, अशा शब्दांत केंद्रीय निवडणूक आयोगाने पर्रीकर यांना आज समज
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 16 - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भविष्यात, बोलताना अधिक काळजी घ्यावी, अशा शब्दांत केंद्रीय निवडणूक आयोगाने पर्रीकर यांना आज समज दिली. निवडणुकीशी संबंधित लाचखोरी माफ करावी, अशा अप्रत्यक्ष अर्थाचे देखील विधान उच्चपदी असलेल्या कोणीच करू नये. पर्रीकर यांनी केलेले विधान निवडणुकीशी संबंधित अटींचे उल्लंघन ठरते, असे आयोगाने स्पष्ट म्हटले आहे.
पर्रीकर यांना यापूर्वी आयोगाने नोटीस पाठवली होती. विधानसभा निवडणुकीवेळी सांताक्रुझ मतदारसंघातील चिंबल येथे भाजपच्या बैठकीवेळी पर्रीकर यांनी काही विधाने केली होती. तुम्ही कोणाकडूनही दोन हजार रुपये घेता व मत देता. तसे करणे ओके आहे. कोणी तरी रॅली काढील. जर कोणी पाचशे रुपये घेऊन फिरत असेल तर आपला आक्षेप नाही, असे पर्रीकर यांनी म्हटले होते, असे निवडणूक आयोगाने गुरुवारी जारी केलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे. पर्रीकर यांनी आपण अशा अर्थाचे विधान केले नव्हते, आपल्या कोकणी वक्तव्याचा चुकीचा अनुवाद केला गेला, असे म्हटले होते.
आम्ही सीडीची सत्यता पडताळून पाहिली. शिवाय कोकणीतील तज्ज्ञांकडून आणि एका तज्ज्ञ समितीकडूनही अनुवाद करून घेतला. सर्वांनी एकच अभिप्राय दिला. म्हणजे अनुवाद व्यवस्थित झाला आहे, असे आयोगाने सांगितले.
सर्वच नेते आणि विशेषत: जे उच्चपदी असतात त्यांनी निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य जपणे गरजेचे असते. अशा प्रकारच्या पावित्र्याला नेत्यांनी प्रोत्साहन द्यायला हवे. उच्चपदी असलेल्या व्यक्तीने निवडणुकीतील लाचखोरी माफ करण्याबाबतच्या अर्थाचे विधान दुरान्वयानेही करणे हा भ्रष्ट व्यवहार ठरतो आणि तो निवडणूकविषयक गुन्हाही ठरतो, असे आयोगाने म्हटले आहे. तसेच पर्रीकर यांचे विधान निवडणूकविषयक अपेक्षा व अटींचे उल्लंघन ठरते. त्यामुळेच भविष्यात अधिक काळजी घ्यावी, असा सल्ला तुम्हाला निवडणूक आयोग देत असल्याचे आयोगाचे सचिव सुमित मुखर्जी यांनी म्हटले आहे. पर्रीकर यांना या पत्राची प्रत आयोगाने पाठवून ते पत्र स्वत:च्या संकेतस्थळावरही जाहीर केले. (खास प्रतिनिधी)