पल्लवी धेपेंच्या प्रचारावर मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष; दक्षिणेचे स्वतः करताहेत दौरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2024 08:17 AM2024-04-04T08:17:39+5:302024-04-04T08:20:31+5:30
तानावडेंसह इतर नेतेही मैदानात
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पल्लवी धेपे यांच्या प्रचाराकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे दक्षिणेत प्रचाराचे दौरे वाढले आहेत.
पल्लवी या नव्यानेच राजकारणात आलेल्या असून, प्रथमच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजपने आपली पूर्ण यंत्रणा त्यांच्या प्रचारासाठी लावली आहे. रोज जाहीर सभा, कोपरा बैठका तसेच घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. आतापर्यंत शिरोडा, सांगे, केपे आदी ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पल्लवी यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या.
मंगळवारी मडकई मतदारसंघात मगोपचे स्थानिक आमदार तथा वीज मंत्री सुदिन ढवळीकर याना जाहीर सभा आयोजित करायला सांगून उपस्थिती लावली. मुख्यमंत्री ज्या दिवशी इतर कामांमध्ये व्यस्त असतात, त्या दिवशी तानावडे प्रचाराची धुरा सांभाळतात. केंद्रात मोदी सरकारने गोरगरिबांसाठी आणलेल्या कल्याणकारी योजना, राज्यात सावंत सरकार राबवत असलेले उपक्रम तसेच विकासकामे प्रचारात लोकांसमोर ठेवली जात आहेत. बैठका, सभांना लोकांचा वाढता सहभाग मिळावा यासाठी पक्षीय यंत्रणा कामाला लागली आहे.
उमेदवार म्हणून पल्लवी यांचा चेहरा लोकांसाठी नवीन आहे. तरीही त्या महिला व युवा मतदारांशी कनेक्ट होताना दिसत आहेत. मंदिरे, चर्चना भेट देतात. धर्मगुरूंचे आशीर्वाद घेतात. उमेदवारी जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पल्लवी यांनी प्रचार सुरू केला आहे. आतापर्यंत त्यांच्या अनेक सभा झालेल्या आहेत. उद्या, ५ रोजी पल्लवी धंपे यांची दक्षिण गोवा मतदारसंघातील प्रचाराची पहिली फेरी पूर्ण होईल, असे भाजप सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
कुठ्ठाळी, सांकवाळ दौरा
पल्लवी यांच्या प्रचारासाठी आज, गुरुवारी कुठ्ठाळी, सांकवाळ भागात बैठका होणार आहेत. सकाळी ११ वाजता कुठ्ठाळीत मांगिरीष देवस्थानात देवदर्शन घेऊन पल्लवी प्रचाराला सुरुवात करतील. ११:३० वाजता कुठ्ठाळी, मानस येथे मॅथ्यू हॉलमध्ये बैठक आयोजित केली आहे. त्यानंतर दुपारी २:३० वाजता सांकवाळ येथे चर्च हॉलमध्ये सभा होईल. दुपारी ३ वाजता सांकवाळला देवी शांतादुर्गा मंदिरात पल्लवी देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी ३:३० वाजता कुठ्ठाळी भाजप मंडल कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष तानावडे संबोधतील.