राजधानीत सापडलेल्या 'त्या' मुर्त्यांच्या अभ्यासासाठी पुरातत्व खाते स्थापन करणार खास कमिटी
By समीर नाईक | Published: July 6, 2024 03:44 PM2024-07-06T15:44:30+5:302024-07-06T15:44:39+5:30
कमिटीमध्ये राज्यातील पुरातत्व खात्यातील तज्ञांसोबत भारतीय पुरातत्व खात्यातील अधिकारी असणार आहेत.
पणजी: राजधानीत स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरु असताना मिळालेल्या त्या दोन प्राचीन मुर्त्याचे लवकरच कार्बन डेटींग करण्यात येणार आहे. यासाठी पुरातत्व खात्याकडून खास एक कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. सदर कमिटीच या मुर्त्यांचा पूर्ण अभ्यास करुन अहवाल सादर करतील. यासाठी निश्चितच थोडा वेळ लागणार आहे, अशी माहिती पुरातत्व खात्याचे संचालक डॉ. निलेश फळदेसाई यांनी सांगितले.
सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या कमिटीमध्ये राज्यातील पुरातत्व खात्यातील तज्ञांसोबत भारतीय पुरातत्व खात्यातील अधिकारी असणार आहेत. पणजीत ज्या मुर्त्या मिळाल्या आहेत, त्या अंदाजे साडेपाच ते सहा फुटाच्या आहेत. त्यातील एक मुर्ती चांगल्या स्थितीत आहे, तर एका मुर्ती मोडलेली आहे, ज्याचे इतर भाग त्याचठिकाणी मिळाले. शिरदोन येथे देखील अशा मुर्त्या आहेत, त्यामुळे या मुर्त्या कुठल्या काळातील आहेत, याबाबत अंदाज घेणे सोपे हाेईल. या मुर्त्या पोर्तुगीसकालीन आहेेत, असाही अंदाज व्यक्त होत आहे, पण ठोस काही अहवालानंतरच कळेल असे डॉ. फळदेसाई यांनी सांगितले.
याच वर्षी मे महिन्यात चर्च स्क्वेअर येथील पालिका उद्यानसमोरील भागात खोदकाम करताना प्राचिन दोन दगडी मुर्त्या सापडल्या होत्या. याबाबत माहीती मिळताच पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देत या मुर्त्या आपल्या ताब्यात घेतल्या हाेत्या. पण मे महिन्यात आचारसंहीता लागू असल्याने काहीच करता आले नाही. पण आता या प्रक्रीयेला सुरुवात झाली असून, पुढील काही दिवसात या मुर्त्यांबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे, असेही डॉ. फळदेसाई यांनी सांगितले.