पालिकांना साधनसुविधा निर्माणासाठी विशेष अनुदान, अधिसूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 09:21 PM2018-12-06T21:21:11+5:302018-12-06T21:22:11+5:30
सरकारकडून नवी विशेष अनुदान योजना अधिसूचित
पणजी : राज्यातील तीन नगरपालिकांच्या क्षेत्रात साधनसुविधांचे निर्माण करण्यासाठी पालिका प्रशासन खात्याकडून विशेष अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी गुरुवारी सरकारने नवी विशेष अनुदान योजना अधिसूचित केली. या अंतर्गत अर्थसाह्य देण्याची पद्धत निश्चित केली गेली आहे.
म्हापसा, कुडचडे आणि डिचोली या तीन पालिकांना विशेष अनुदान देण्याचे सरकारने ठरवले आहे. जे प्रकल्प विशेष साधनसुविधा गटात येतील व जे प्रकल्प एका प्रभागापेक्षा जास्त प्रभागातील लोकांना लाभदायी ठरतील, अशा प्रकल्पांसाठीच हे अनुदान असेल. तसेच जे प्रकल्प पालिकेला महसुल प्राप्त करून देऊ शकतील असेही प्रकल्प विशेष अनुदानासाठी पात्र ठरतील, असे अधिसूचनेत म्हटले आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात पालिकांनी अशा प्रकल्पांचे काम सुरू करावे असे सरकारला अपेक्षित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आली आहे.
तिन्ही पालिकांनी प्रकल्पांसाठी प्रस्ताव पालिका प्रशासन खात्याकडे सादर करावेत. त्या प्रस्तावासोबत पालिकेचा ठराव असावा तसेच जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रे आणि तांत्रिक मंजुरी असावी. अंदाजित खर्चही नमूद केलेला असावा असे अपेक्षित आहे. नगर विकास खात्याच्या गंगाजळीतून हप्त्याहप्त्याने प्रकल्पासाठी निधी दिला जाईल. जो निधी वीनावापर उरेल, तो सरकारला परत करावा लागेल, असे अधिसूचनेत म्हटले आहे. प्रकल्पांसाठी अनुदान मंजुर करण्यामध्ये जर योजनेतील एखादी तरतुद अडचणीची ठरत असेल तर ती तरतुद शिथिल करण्याचा अधिकार सरकारने स्वत:जवळ राखून ठेवला आहे.
दरम्यान, राज्यात एकूण चौदा पालिका आहेत. अनेक पालिका आपल्याला सरकारकडून दरवर्षी विविध प्रकारचे अनुदान नियमितपणो मिळत नाही अशा तक्रारी करत आहेत. म्हापसा पालिकेसह अनेक पालिकांचा निधी यापूर्वी अडला होता.