पावसाळ्यात रात्रीची आणीबाणी हाताळण्यासाठी पणजी महापालिकेचे विशेष पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 08:57 PM2020-06-18T20:57:43+5:302020-06-18T20:58:03+5:30
महापौर उदय मडकईकर यांची माहिती
पणजी : पणजी महापालिका पावसाळ्यात रात्रीच्यावेळी उद्भवणारी आणीबाणीची स्थिती हाताळण्यासाठी विशेष पथक स्थापन करणार आहे. पूरस्थिती, झाडांची पडझड, दरडी कोसळणे तसेच इतर आपत्तीच्यावेळी ६ जणांचे हे पथक तात्काळ मदतकार्यासाठी दाखल होईल.
महापौर उदय मडकईकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘सकाळी १0 ते सायंकाळी ६ आणि रात्री १0 ते सकाळी ६ अशी दोन पथके कार्यरत आहेत परंतु मधल्या काळात सायंकाळी ६ ते रात्री १0 काही घटना घडल्यास अडचण येत होती. आता या वेळेत काम करण्यासाठी आणखी एक पथक स्थापन केले जाईल. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्युसारखे साथीचे रोग पसरतात तेव्हा लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
तीन-चार दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसात शहरातील गटारे तुंबून पाणी साचल्याने त्याबद्दल महापौरांना विचारले असता ते म्हणाले की, गटारांमध्ये दूरसंचार कंपन्यांनी तसेच वीज खात्याने केबल्स टाकल्याने कचरा अडकून गटारे तुंबली. यापुढे गटारांमध्ये केबल्स घालू देणार नाही. पुनरावृत्ती घडल्यास कोणाचीही गय करणार नाही.