गोव्यात क्रीडा विद्यापीठ येण्याची शक्यता: मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 02:16 PM2023-10-12T14:16:16+5:302023-10-12T14:16:39+5:30

क्रीडामंत्र्यांनी निवडक संपादकांशी साधला संवाद

sports university likely to come up in goa said cm pramod sawant | गोव्यात क्रीडा विद्यापीठ येण्याची शक्यता: मुख्यमंत्री 

गोव्यात क्रीडा विद्यापीठ येण्याची शक्यता: मुख्यमंत्री 

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोवा सज्ज झाला आहे. गोव्यात क्रीडा क्षेत्राचा व्याप यापुढे खूप वाढणार आहे. त्यामुळेच नजिकच्या काळात गोव्यात क्रीडा विद्यापीठ उभे राहण्याची शक्यता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केली. गोव्यातील निवडक संपादकांशी मुख्यमंत्री सावंत आणि क्रीडमंत्री गोविंद गावडे विशेष संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, पतंप्रधान २६ रोजी गोव्यात येतील. पाच ते सहा तास गोव्यात असतील. उद्घाटनानंतर ते दिल्लीला परतणार आहेत. क्रीडा स्पर्धाच्या काळात ११ हजार खेळाडूंना गोवा राज्य हाताळणार आहे. क्रीडा पर्यटनासाठी या स्पर्धेचा मोठा लाभ गोव्याला होईल. क्रीडा विद्यापीठ गोव्यात व्हायला हवे, असे मला वाटते. एक-दोन संस्थांनी त्याबाबत रस दाखवला आहे. जर कोणाही खासगी संस्थेने ५० हजार चौरस मीटर जागा स्वतःची दाखवली तर त्या संस्थेला विद्यापीठ सुरू करता येईल. मात्र, खासगी संस्थेला जागा स्वतः घ्यावी लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आम्ही कोणत्याही योग्य संस्थेला क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यास मान्यता देऊ शकतो. गोव्यात क्रीडा हे करिअर म्हणून भविष्यात अनेकजण स्वीकारतील. तसेच क्रीडा साहित्य आणि क्रीडा प्रशिक्षण खूप खर्चिक आहे. अनेकजण महागडे खासगी कोच ठेवतात. प्रत्येक खेळाडूला ते शक्य नाही. पण, क्रीडा विद्यापीठ गोव्यात उभे राहिल्यानंतर गोव्यातील ही स्थिती बदलेल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी लगीनघाई; गोवा सज्ज

गोव्यात येत्या २६ पासून होऊ घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी लगीनघाई सुरू आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी बुधवारी स्पर्धांचे प्रमुख ठिकाण अससलेल्या ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियमची पाहणी केली. ९९ टक्के काम पूर्ण झाले असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ते म्हणाले की, 'राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी वापरण्यात येणार असलेली सर्व स्थळे येत्या १५ पूर्वी ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडियाच्या ताब्यात दिली जातील. बॅडमिंटन स्पर्धा येत्या १९ पासून सुरु होतील. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे येत्या २६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, ९ नोव्हेंबरपर्यंत स्पर्धा चालेल.

क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणाले की, "या स्पर्धांच्या निमित्ताने गोवेकरांमध्ये खेळांविषयी नवीन आवड निर्माण होईल, अशी आशा आहे. २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील १० हजारहून अधिक खेळाडू सहभागी होतील. दक्षिण गोव्यात फातोर्डा येथे पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर उद्घाटन होईल. देशी खेळांसह ४३ क्रीडा प्रकार या स्पर्धेत असतील.

१० ठिकाणी सोहळ्याचे प्रेक्षेपण

क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणाले की, पंतप्रधानांच्या उपस्थितीत जो उद्घाटन सोहळा होईल तो गोव्यात दहा ठिकाणी दाखवला जाणार आहे. त्यासाठी मोठ्या स्क्रिन उभ्या केल्या जातील. पंतप्रधानासमोर उद्घाटनावेळी ७०० कलाकार एकाचवेळी कार्यक्रम सादर करतील. केंद्रीय क्रीडामंत्रीही त्यावेळी उपस्थिती असतील.

मुख्यमंत्री म्हणाले, गोव्यातील पोलिस सुरक्षा व्यवस्था चोख बजावतील. मनुष्यबळ विकास महामंडळ १ हजार सुरक्षारक्षक पुरवणार आहे. ३५०० विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम पाहतील. गोव्याचे वरिष्ठ अधिकारी संदीप जॅकीस, प्रताप लोलयेकर, संजित रॉड्रिग्स अशा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.


 

Web Title: sports university likely to come up in goa said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.