एसटी समाजाचा विधानसभेवर मोर्चा; आंदोनकर्त्यांना पोलिसांनी अडवले
By समीर नाईक | Published: February 5, 2024 04:22 PM2024-02-05T16:22:41+5:302024-02-05T16:22:50+5:30
एसटी समाजाच्या या आंदोलनाला आरजीचे आमदार विरेश बोरकर यांनी खास एसटी समाजाची वेशभूषा परिधान करत पाठींबा दिला.
पणजी: एसटीना राजकीय आरक्षण मिळावे ही मागणी करत एसटी समाजातील असंख्य लोकांनी सोमवारी विधानसभेवर मोर्चा आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना पणजी बसस्थानक जवळील सर्कलवर पोलिसांनी अडविले. यातून पोलिस व आंदोनकर्त्यांनमध्ये संघर्ष दिसून आला. दरम्यान आंदोलनकर्त्यानी पणजीत मुख्य रस्ते रोखले आहेत.
एसटी समाजाच्या या आंदोलनाला आरजीचे आमदार विरेश बोरकर यांनी खास एसटी समाजाची वेशभूषा परिधान करत पाठींबा दिला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पाटकर, गिरीश चोडणकर, आपचे राज्य निमंत्रक ॲड. अमित पालेकर यांनी देखील पाठिंबा दिला.
एसटी बांधवांची जी मागणी आहे, ती कायद्याला धरून आहे. त्यांना वारवार भाजप सरकारने राजकीय आरक्षणाचे आश्वासन दिले, परंतु हे आश्वासन त्यांनी केव्हाच पूर्ण केले नाही. एसटी समाजाचा वापर केवळ मतांसाठी केला जातो, परंतु आता एसटी समाज जागा झाला असून, आपल्या हक्कासाठी लढा देण्यास सज्ज आहे, असे मत आमदार वीरेश बोरकर यांनी व्यक्त केले.
आम्ही एसटी समाजाच्या राजकीय आरक्षण विषयी मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेत विचारणा केल्यावर त्यांनी बुधवारपर्यंत उत्तर देणार असल्याचे सांगितले, पण तोपर्यंत एसटी बांधव रस्त्यावर काय करणार याचा विचार ते करत नाही. भाजपने यापूर्वी केंद्रात एक शिष्टमंडळ पाठवून हा विषय मार्गी लावण्याचे सांगितले होते, ते देखील त्यांनी केलेले नाही, असे बोरकर यांनी यावेळी सांगितले.
सरकारने आतापर्यंत एसटी समजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. एसटी समाजाला आरक्षण बाबतीत जी काही आश्वासने दिली आहेत, ती देखील पूर्ण करण्यात आलेली नाही. हे सरकारच खोटारडे आहे, असा आरोप यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पाटकर यांनी केला.