शैक्षणिक गोंधळाला दणक्यात प्रारंभ
By admin | Published: June 14, 2016 02:52 AM2016-06-14T02:52:58+5:302016-06-14T02:56:29+5:30
पणजी : राज्यात शाळा सुरु होऊन एक आठवडा उलटला असला तरी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत देण्यात येणारी
पणजी : राज्यात शाळा सुरु होऊन एक आठवडा उलटला असला तरी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत देण्यात येणारी पाठ्यपुस्तके अजूनही मिळालेली नाहीत. काही शाळांत केवळ एक ते दोन विषयांची पुस्तके देण्यात आली आहेत. तर काही विद्यालयांनी गेला आठवडाभर मधल्या सुट्टीतच वर्ग सोडले असल्याने शिकवणीला सुरुवातच केली नाही. पावसाळा सुरु झाला तरी सरकारी शाळांमधील मुलांना अजूनही गणवेश आणि रेनकोट मिळालेले नाहीत.
पहिली व तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश आणि रेनकोट शिक्षण खाते देत असते. पावसाळा सुरु होताना तरी आमच्या मुलांना रेनकोट दिले जावेत अशी पालकांची दरवर्षी मागणी असते. मात्र, कुठच्याच वर्षी वेळेत रेनकोट व गणवेशही मिळत नाहीत. शिक्षण खात्याचे बहुतांश अधिकारी मे महिन्यात रजेवर जातात. या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी अधिकारी रजेवर असताना कामच करत नाहीत. अधिकारी जूनमध्ये रुजू होतात, यामुळेच गणवेश व रेनकोटना विलंब होतो.
सोमवारपासून शाळेचा दुसरा आठवडा सुरु झाला असून विद्यालयांतील शिक्षकांनी आपल्या विषयासाठी आवश्यक असलेल्या वह्यांची सूची दिली. सुरुवातीचे दोन दिवस वगळता शाळा नेहमीच्या वेळेवर सोडण्यात आली. मधल्या वेळेत मुलांना अभ्यास देणे आवश्यक असल्याने स्पेलिंग, पाढे, बाराखडी गिरवणे असा अभ्यास देऊन विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवण्यात आले. शाळा सुरु झाली तेव्हापासूनच पावसाने सुरुवात केली असल्याने मुलांना पटांगणात खेळण्यासाठी सोडणेही शक्य होत नाही. पुस्तके न मिळल्याने अभ्यासालाही सुरुवात होत नसल्याने अजूनही वर्गात मजामस्ती करण्याच्या मूडमध्ये मुले शाळेला जात आहेत.
शिक्षण खात्यातर्फे राज्यातील शाळा सुरु होण्यापूर्वीच सर्व तालुकास्तरीय भाग- शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पुस्तके पोहोचविण्यात येतील असे सांगितले गेले होते. मात्र, अजूनही बऱ्याचशा भागशिक्षणाधिकारी कार्यालयांत पुस्तके पोहोचली नसल्याने सूत्रांनी सांगितले.
शाळा सुरु होण्यापूर्वी सर्व विद्यालयांत पुस्तके पोहोचविण्यात येतील, असे दरवर्षी शिक्षण खात्यातफे जाहीर करण्यात येते. मात्र, प्रत्येक वर्षी शाळांमध्ये आठवडा उलटला तरी पुस्तके दिली जात नाहीत. राजधानी पणजीतील काही शाळांमध्येही पुस्तके देण्यात आली नाहीत. पुस्तके नसल्याने अभ्यास घेता येत नाही आणि शाळेत विद्यार्थी दंगा करतात. यामुळे काही शिक्षक जुन्या वर्गातील विद्यार्थ्यांची पुस्तके मागवून घेऊन नव्याने प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांना देतात आणि अभ्यास सुरु करतात. मात्र, या प्रकारात सर्वच मुलांना पुस्तके मिळत नाहीत.
जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरु होतात हे माहीत असूनही खात्यातर्फे पुस्तके पहिल्या आठवड्यापर्यंत शाळेत पाठविण्याची तजवीज केली जात नाही. (प्रतिनिधी)