संजय स्कुल व्यवसायिक व पुनर्वसन केंद्र सुरु करा; दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांनी केली मागणी
By पूजा प्रभूगावकर | Published: January 6, 2024 12:38 PM2024-01-06T12:38:32+5:302024-01-06T12:39:24+5:30
अन्यथा पर्पल फेस्ट कडे आंदोलन करण्याचा इशारा
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: पर्वरी येथील संजय स्कुलचे व्यवसायिक व पुनर्वसन केंद्र मागील काही महिन्यांपासून बंद असून ते पुन्हा सुरु करण्याची कुठलीही तसदी सरकार घेत नसल्याने या केंद्रात शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांनी पणजी येथील आझाद मैदानावर डिसबिलटी राईट असाेसिएशन ऑफ गोवा (ड्रॅग) संघटनेच्या बॅनरखाली निषेध केला.
सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित पर्वरी येथील संजय स्कुलचे बंद व्यवसायिक व पुनर्वसन केंद्र सुरु करावे. अन्यथा पर्पल फेस्ट महोत्सवाच्या ठिकाणी आंदोलन करु असा इशाराही पालकांनी यावेळी दिला.
ड्रॅग संघटनेचे अध्यक्ष अवलिनो डिसा म्हणाले, की संजय स्कुलचे व्यवसायिक व पुनर्वसन केंद्र हे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे.केंद्राची इमारत धोकादायक असून ती असुरक्षित असल्याने सदर केंद्र बंद केल्याचे सांगितले जात आहे. इमारत असुरक्षित असली तरी केंद्र पर्यायी जागेत स्थलांतरीत करुन पुन्हा सुरु केले जावू शकते. मात्र या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.