दक्षिण गोव्यात तब्बल 9 खाणींवरील वाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 05:37 PM2020-04-27T17:37:40+5:302020-04-27T17:38:01+5:30
या पार्श्वभूमीवर गाकुवेध फेडरेशन या संघटनेने न्यायालयात धाव घेण्याची तयारी चालविली आहे.
मडगाव: लॉकडाऊनच्या काळात देशाची निकड लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने नियंत्रित खनिज वाहतुकीला परवानगी दिली असली तरी गोव्यात खनिज कंपन्यांनी त्याचा मोठ्या प्रमाणावर गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या दक्षिण गोव्यात एकूण 9 खाणीवरील वाहतूक सुरू झाली असून त्यामुळे एकाच बरोबर 200 ते 250 ट्रक रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीची कोंडी वाढू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर गाकुवेध फेडरेशन या संघटनेने न्यायालयात धाव घेण्याची तयारी चालविली आहे. या फेडरेशनचे सदस्य रवींद्र वेळीप म्हणाले, याचा पहिला टप्पा म्हणून आम्ही खाण कंपन्या आणि अधिकारणीना कायदेशीर नोटीस पाठवू तरीही वाहतूक सुरळीत न झाल्यास आम्ही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू.
सोमवारी सकाळी कुडचडे परिसरात ट्रक मोठ्या प्रमाणात दिसत होते. एका नागरिकाने, ज्यावेळी या भागात मायनिंग बूम होते त्यावेळी जशी परिस्थिती होती तशीच आता झाली आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयाने खनिज वाहतूक करण्यासाठी जी सहा महिन्यांची मुदत घालून दिली आहे ती जुलै महिन्यात संपते त्यानंतर राहिलेल्या खनिजावर सरकारची मालकी येणार असल्याने पाऊस सुरू होईपर्यंत जास्तीत जास्त खनिज माल वाहून नेण्यासाठी खनिज कंपन्यांनी सध्या नेट लावला आहे अशी प्रतिक्रिया कावरे केपे येथील रवींद्र वेळीप यांनी व्यक्त केली.
मागच्या गुरुवारी कावरे येथे रस्त्यावर 170 च्या आसपास ट्रक उतरल्याने कावरेच्या लोकांनी ही वाहतूक अडवून धरली होती. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून ट्रकवाल्यांना समज दिली होती. यामुळे सोमवारी ट्रक हकण्याची गती थोडी कमी होती. मात्र त्यांची संख्या कमी झालेली नाही असे वेळीप यांनी सांगितले.