राज्य सहकारी बँकेची होणार चौकशी
By Admin | Published: August 6, 2015 02:31 AM2015-08-06T02:31:10+5:302015-08-06T02:31:21+5:30
पणजी : राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यांची चौकशी केली जाईल, अशी घोषणा सहकारमंत्री महादेव नाईक यांनी विधानसभेत केली
पणजी : राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यांची चौकशी केली जाईल, अशी घोषणा सहकारमंत्री महादेव नाईक यांनी विधानसभेत केली. राजकारण्यांना तब्बल १४ कोटी रुपयांची कर्जे माफ करण्यात आली. आता ही बँक ४५ कोटी रुपये तोट्यात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तरादाखल ते बोलत होते. कर्जाच्या बाबतीत मोठा थकबाकीदार ठरलेल्या सुभाष शिरोडकर यांना ७४ लाख रुपये कर्ज माफ करण्यात आले. ज्या काळात ही कर्जमाफी देण्यात आली, त्याच काळात शिरोडकर यांनी शिरोडा येथे १ लाख ८७ हजार चौरस मीटर जमीन घेतली. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असे ते म्हणाले.
म्हापसा अर्बन बँकेची आजची स्थितीही अशाच कारभारामुळे झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.
शिरोडा एज्युकेशन सोसायटीला म्हापसा अर्बनने एका रात्रीत २ कोटी १० लाख रुपये कर्ज मंजूर केले. या प्रकरणात तीन माजी मंत्र्यांनी एकमेकांना सांभाळण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारामुळे
सहकार क्षेत्राची पुरती वाट लागली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शिरोडकर यांचे नाव घेऊन
त्यांनाच लक्ष्य केले जात असल्याने काँग्रेसी आमदारांनी त्यास आक्षेप घेतला.
समाजकल्याण खात्याच्या अनुदान मागण्यांवर कपात सूचना मांडताना विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे म्हणाले की, केवळ १० हजार लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला अनुसूचित जमातींचा दर्जा मिळायला हवा.
शिक्षण, नोकऱ्यांमध्ये त्यांना राखीवता मिळायला हवी.
(प्रतिनिधी)