गोव्यात राज्य चित्रपट महोत्सव 21 एप्रिलपासून सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 06:38 PM2018-02-28T18:38:54+5:302018-02-28T18:38:54+5:30
गोवा मनोरंजन संस्था व माहिती व प्रसिद्धी खात्याच्या संयुक्त विद्यमाने, ९ वा गोवा राज्य चित्रपट महोत्सव येत्या २१ ते २४ एप्रिल या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या चित्रपट महोत्सवाचे पुरस्कार कोंकणी चित्रपट दिवसा निमित्त २४ रोजी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पणजी: गोवा मनोरंजन संस्था व माहिती व प्रसिद्धी खात्याच्या संयुक्त विद्यमाने, ९ वा गोवा राज्य चित्रपट महोत्सव येत्या २१ ते २४ एप्रिल या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या चित्रपट महोत्सवाचे पुरस्कार कोंकणी चित्रपट दिवसा निमित्त २४ रोजी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी संस्थेच्या सीईओ मृणाल वाळके, सदस्य संदीप कुंडईकर व माहिती प्रसिध्दी खात्याचे अधिकारी प्रकाश नाईक उपस्थित होते. कोंकणी चित्रपटाचे पिता अल जॅरी ब्रागांझा यांनी निर्मिती केलेला मोगाचो आवंडो प्रथम कोंकणी चित्रपट हा २४ एप्रिल १९५० मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. एरव्ही तियात्र व दाल्गाद अकादमी मिळून हा दिवस साजरा करायचे. ते यंदा मनोरंजन संस्था करणार असून गोवा राज्य चित्रपट महोत्सव पुरस्कार २०१८ या दिवसा निमित्त प्रदान करण्यात येणार असल्याचे तालक यांनी सांगितले.
१ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत तयार झालेले चित्रपट या महोत्सवासाठी पात्र आहेत. आजपासून महोत्सवात सहभागी होणा-या चित्रपटांसाठी नोंदणी सुरू केली जाईल ते २५ मार्च पर्यंत शेवटची मुदत देण्यात आली आहे. या महोत्सवात दोन विभागांत चित्रपट स्विकारले जाईल. फिचर चित्रपट व नॉन फिचर चित्रपट असे दोन विभाग करण्यात आले आहे. फिचर चित्रपट विभागात कोंकणी व मराठी चित्रपट भाषेतील चित्रपटांसाठी दोन वेगवेगळे विभाग असेल. तर नॉन फिचर विभागात सर्व भाषांतील चित्रपट एकच विभाग असेल. फिचर चित्रपट किमान ७० मिनीटांचा असला पाहिजे तर नॉन फिचर चित्रपट ५ मिनीट ते ७० मिनीटांच्या आत असला पाहिजे. चित्रपटांतील १५ टक्के आॅनस्क्रिन कलाकार व १५ टक्के तंत्रज्ञ गोव्यातील असले पाहिजे व त्यांच्या कडे १५ वर्षांचा निवासी दाखला असला पाहिजे. दोन्ही विभागातील चित्रपटांकडे १ जावेलारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीचे सेंन्सर प्रमाणपात्र असले पाहिजे व चित्रपटांना इंग्रजी सबटाईटल्स अनिवार्य आहेत. अधिक माहितीसाठी www.esg.co.in या वॅबसाईटवर लॉगईन करावे नोंदणी अर्ज सुध्दा या वॅबसाईटवर उपलब्ध करण्यात आले आहेत असे तालक यांनी सांगितले.
फिचर चित्रपट विभागात मराठी व कोंकणी चित्रपटांसाठी वेगवेगळे पुरस्कार देण्यात येईल. प्रथम उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार ५ लाख रूपये, व्दितीय उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार ३ लाख रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच उत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम ५ हजार रूपये , द्वितीय उत्कृष्ट दिग्दर्शकासाठी ३५ हजार रूपये दिले जाईल. तर उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता , उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, उत्कृष्ट बाल कलाकार, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट पटकथा, उत्कृष्ट गिते, उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट गायिका, उत्कृष्ट सिनेमेटोग्राफी, उत्कृष्ट एडिटर, उत्कृष्ट आॅडियोग्राफी, उत्कृष्ट कला दिग्दर्शक, उत्कृष्ट वेशभुषा डिझाईनर यांना प्रत्येकी २५ हजार रूपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
नॉन फिचर चित्रपट विभागात उत्कृष्ट फिक्शन चित्रपटाला १ लाख रूपये पुरस्कार व उत्कृष्ट नॉन-फिक्शन चित्रपटाला १ लाख रूपये असे पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तसेच उत्कृष्ट सिनेमेटोग्राफी, उत्कृष्ट एडिटींग , उत्कृष्ट संगीत दिग्दर्शन व उत्कृष्ट संकल्पना यासाठी २५ हजार रूपये प्रत्येकी असे पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
चित्रपट महोत्सवातील चित्रपटांचे परिक्षण करण्यासाठी गोव्याबाहेरील ज्युरीना आमंत्रीत केले जाईल. या चित्रपट महोत्सवाचे १ कोटी वर बजेट आहे. पुरस्कार सोहळ्या नंतर पुन्हा हे चित्रपट प्रदर्शित केले जाईल. जेणे करून योग्य चित्रपटांना योग्य पुरस्कार मिळाला आहे की नाही हे लोकांना कळेल व महोत्सवात संधी न मिळालेल्यांना चित्रपट बघण्यासाठी संधी मिळेल असे तालक यांनी सांगितले.
या महोत्सवात ८ ते १० चित्रपटांची अपेक्षा आहे. गोव्यात पूर्वी १ ते २ चित्रपट व्हायचे मात्र चित्रपट महोत्सवांमुळे चित्रपट निर्मितीची संख्या वाढली असून वर्षाला ८ ते १० चित्रपट तयार होतात. गोव्यातील चित्रपटांचा दर्जा सुध्दा वाढला असून आणखी संख्या वाढायला हवी असे तालक म्हणाले. गोव्यातील चित्रपटांना आयनॉक्स सहाय्य करण्यासाठी तयार असून गोमंतकीय चित्रपट निर्माते येथे चित्रपट घेऊन आले पाहिजेत असे तालक यांनी सांगितले.