राज्यातील बेकायदा रेती उपसा रोखा
By admin | Published: September 13, 2015 03:04 AM2015-09-13T03:04:50+5:302015-09-13T03:05:05+5:30
पणजी : रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. बेकायदा रेती उपसा रोखण्यासाठी सशस्त्र पोलिसांचाही
पणजी : रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. बेकायदा रेती उपसा रोखण्यासाठी सशस्त्र पोलिसांचाही वापर करण्यात यावा, असे या आदेशात म्हटले आहे. बेकायदा रेती उपशाविरुद्ध उत्तर गोव्यातील तीन नागरिकांनी हरित लवादाकडे धाव घेतली होती.
लवादाचे न्यायाधीश व्ही. आर. किनगावकर आणि अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात बेकायदा रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात यावी. असे प्रकार करणाऱ्यांना अटक करून गुन्हे दाखल करण्यात यावे, असे म्हटले आहे. बेकायदा रेती उपसा रोखण्यासाठी सशस्त्र पोलिसांचाही वापर करण्यात यावा, असा आदेश लवादाने दिला आहे.
उत्तर गोव्यात तुये येथे शापोरा नदीतून मोठ्या प्रमाणात रेती उपसा चालू असल्याचा दावा करून उत्तर गोव्यातील साईदास खोर्जुवेकर व इतर नागरिकांनी हरित लवादाकडे धाव घेतली होती. रेती उपशावर राष्ट्रव्यापी बंदी असताना पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून होणाऱ्या बेकायदा प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता.
बेकायदा रेती उपसा होणार नाही याची खबरदारी घेताना उत्तर गोवा जिल्हाधिकारी, खाण मंत्रालय, पर्यावरण खाते आणि इतर संबंधित सरकारी खात्यांकडून यंत्रणा उभारली जावी तसेच रात्रीची गस्तही घालावी. तसे प्रकार आढळल्यास रेती उपसा करणाऱ्या होड्या व वाहने जप्त करण्यात यावीत, असेही आदेशात म्हटले आहे.
(प्रतिनिधी)