पर्रीकरांनी ४८ तासात मुख्यमंत्रीपद न सोडल्यास राज्यव्यापी आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 06:33 PM2018-11-20T18:33:39+5:302018-11-20T18:35:08+5:30
एनजीओ तसेच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा
पणजी : आजारी असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या राजीनाम्याची मागणी करीत बिगर शासकीय संघटना, काँग्रेस तसेच अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दोनापॉल येथे त्यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेला. मात्र पोलिसांनी मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत जाऊ न देता अर्ध्यावरच अडविला. शिष्टमंडळाने पर्रीकरांची मागितलेली भेटही नाकारण्यात आली. या पार्श्वभूमीवर मोर्चाचे निमंत्रक आयरिश रॉड्रिग्स यांनी ४८ तासांची मुदत दिली असून पर्रीकर यांनी राजीनामा न दिल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन केले जाईल आणि काही अनुचित घडल्यास त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर राहील, असा इशारा दिला आहे.
आयरिश यांनी दिलेल्या हाकेस अनुसरुन मंगळवारी दुपारी ४ वाजता सुमारे १५0 कार्यकर्ते दोनापॉल येथील इंटरनॅशनल सेंटरजवळ जमा झाले. अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चाने हे कार्यकर्ते पर्रीकर यांच्या खाजगी निवास्थानावर धडक देण्यासाठी निघाले असता काही अंतरावर असलेल्या जलकुंभाजवळ मोर्चा अडविण्यात आला. यावेळी पर्रीकर तसेच सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
दहाजणांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊ द्यावी, असा हट्ट मोर्चेकऱ्यांनी धरला. परंतु त्यांची ही मागणी अमान्य करण्यात आली. सुमारे अर्धा तास घोषणाबाजी तसेच निदर्शने झाल्यानंतर पणजीचे उपजिल्हाधिकारी मोर्चेकऱ्यांकडे आले आणि त्यांनी पर्रीकर यांची भेट घेता येणार नाही, असे सांगितले. यानंतर मोर्चेकरी पांगले परंतु आयरिश रॉड्रिग्स यांनी पर्रीकर यांना भेटू न दिल्याने संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘एवढे दिवस आम्ही म्हणत होतो तेच खरे ठरले. पर्रीकर कोणाचीही भेट घेण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांची शारिरीक अवस्था बिकट बनलेली आहे. ते राज्याचा कारभार चालवू शकत नाही. राज्यपालांनी यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे.
आयरिश म्हणाले की, ‘गेले नऊ महिने प्रशासन कोलमडलले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजारावर आजपावेतो सरकारी तिजोरीतून तब्बल १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. जनतेच्या पैशातून त्यांच्या खाजगी निवासस्थानी अतिदक्षता विभाग स्थापन करण्यात आला. देशात कुठल्याही राज्याच्या इतिहासात असा प्रकार घडलेला नाही. गोव्यातील जनता संयमी म्हणून आजवर सहन करुन घेतले. अन्य राज्यात असा प्रकार घडला असता तर आग उसळली असती.’ पर्रीकरांनी मंत्रिमंडळातील दोघांना आजारी म्हणून डिच्चू दिला आणि स्वत: मात्र त्यांच्यापेक्षाही गंभीर आजारी असताना मुख्यमंत्रीपद सोडले नाही, असे नमूद करुन त्यांनी ४८ तासांच्या आत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर गोव्यातही भडका उडेल. सर्व विरोधी राजकीय पक्ष तसेच एनजीओ या आंदोलनात उतरतील व राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आयरिश यांनी दिला.
काँग्रेसचे नऊ आमदार उपस्थित
सोमवारच्या या मोर्चात विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह काँग्रेसचे ९ आमदार सहभागी झाले होते. यात दिगंबर कामत, क्लाफासियो डायस, विल्फ्रेड डिसा, रेजिनाल्द लॉरेन्स, नीळकंठ हळर्णकर, टोनी फर्नांडिस, फिलिप नेरी रॉड्रिग्स, जेनिफर मोन्सेरात यांचा समावेश होता. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर तसेच अन्य पदाधिकारीही उपस्थित होते. शिवसेनेचे राज्यप्रमुख जितेश कामत, राष्ट्रवादीचे अविनाश भोसले, सरचिटणीस संजय बर्डे हजर होते. वेगवेगळ्या एनजीओंच्या महिला कार्यकर्त्यांनीही उपस्थिती लावली होती.